विधानसभेच्या 30 जागा लढवणार - प्रा. जोगेंद्र कवाडे


मंत्रिमंडळ विस्तारात दोन मंत्रिपदे द्या # पुरोगामी महाराष्ट्रात शिष्यवृत्ती रखडणे चुकीचे ठाणे -  पीपल्स रिपब्लिकन पक्ष हा महायुतीचा घटक पक्ष आहे. त्यामुळे आम्हाला सत्तेत वाटा मिळायलाच हवा. तसेच, विधानसभा निवडणुकीत  आम्हाला योग्य जागा दिल्या नाहीत तर आम्ही 30 जागा लढू, असे पीआरपीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रा. जोगेंद्र कवाडे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले पीआरपीच्या उच्चाधिकार समितीच्या बैठकीचे आयोजन येऊर येथे प्रदेश उपाध्यक्ष राजाभाऊ चव्हाण यांनी केले होते. त्यावेळेस ते बोलत होते. या प्रसंगी पक्षाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष जयदीप कवाडे, गणेश उन्हावणे, चरणदास इंगोले, प्रमोद टाले, अजमल पटेल, कपील लिंगायत, एन. डी. सोनकांबळे, अनिल तुरूकमारे, विजय वाघमारे,  आनंद कडाळे, नागसेन क्षीरसागर,  रत्नाताई मोहोड, मृणाल गोस्वामी,  शमी खान, राजेंद्र हिवाळे, अशोक कांबळे, नंदकुमार गोंधळी उपस्थित  होते. प्रा. जोगेंद्र कवाडे पुढे म्हणाले की, आम्ही महायुतीचे घटक आहोत. आता केंद्रात एनडीएचे सरकार आले आहे. या सरकारने शोषित,  पीडित, कष्टकरी, शेतकरी यांच्या कल्याणासाठी भरीव कामगिरी करावी अशी अपेक्षा आहे. आता निवडणुका संपल्या आहेत. निवडणुकांमध्ये लोक एकमेकांचे विरोधक असतात. शत्रू नसतात, याचे  भान ठेवून कुणीही दुखावणार नाही, याची काळजी सत्ताधारी वर्गाने घ्यायला हवी, असे म्हणत, आम्हाला सत्तेत वाटा हवा आहे. आता मंत्रिमंडळाचा विस्तार केला जाणार असल्याने आम्हाला एक कॅबिनेट आणि एक राज्यमंत्रिपद तसेच महामंडळात प्रतिनिधित्व द्यावे; आगामी विधानसभा निवडणुकीत चांगल्या जागा द्याव्यात; अन्यथा, आम्ही 30 जागांवर निवडणूक लढवू, असे सांगितले. दरम्यान, संविधान बदलण्याचा प्रश्नच निर्माण झालेला नाही. भाजपमधील काही लोकांनी याबाबत विधाने केली होती. त्याविरोधात आम्ही कारवाईची मागणी केल्यानंतर अशी विधाने करणाऱ्यांवर भाजपने कारवाई केली, असेही प्रा. जोगेंद्र कवाडे म्हणाले.
Shahar Varta News
Shahar Varta News