विकासासाठी डबल इंजिन सरकारला कौल - आ. संजय केळकर
काँग्रेसचे खोटे नॅरेटीव्ह तसेच सर्वाचे अंदाज खोटे ठरवत हरियाणामधील नागरिकांनी आपल्या सर्वागिण विकासासाठी पुन्हा एकदा डबल इंजिन सरकारला कौल दिला.असे प्रतिपादन आमदार संजय केळकर यांनी केले आहे. हरियाणा विधानसभा निवडणुकीत भाजपाने तिसऱ्यांदा बहुमताने विजय संपादीत करून दैदीप्यमान यश मिळवल्याने मंगळवारी सायंकाळी घंटाळी चौकात पेढे वाटुन फटाके फोडत जल्लोष करण्यात आला.
हरियाणा आणि जम्मु -काश्मिरमध्ये भाजपची दमदार आगेकूच झाल्याने मंगळवारी ठाण्यामध्ये २० ठिकाणी जल्लोष करण्यात आला. तर, घंटाळी चौकात आ. संजय केळकर यांच्या नेतृत्वाखाली जल्लोष करण्यात आला.भाजपच्या माजी नगरसेविका मृणाल पेंडसे, माजी उपमहापौर ॲड सुभाष काळे, सरचिटणीस विलास साठे, हौसिंग फेडरेशनचे अध्यक्ष सीताराम राणे, ओबीसी मोर्चा अध्यक्ष सुरेश पाटील, उपाध्यक्ष रमेश सागळे,ॲड.अल्केश कदम, नौपाडा मंडल अध्यक्ष विकास घांग्रेकर आदीसह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी माध्यमांशी बोलताना आ. केळकर यांनी, भाजपने सर्व अंदाज खोटे ठरवत हरियाणामध्ये हॅटट्रीक केली. हरियाणाच्या लोकांनी डबल इंजिनला पसंती दिली. लोकांना विकास हवा आहे. कॉग्रेस व इंडिया आघाडीचे खोटे नॅरेटीव्ह इथे चालले नाही.
ही तर सुरुवात आहे. हळुहळु लोकांमध्ये परिवर्तन होत आहे.महाराष्ट्रामध्येही विकास हवा असेल तर डबल इंजिन सरकारच हवे असे आ. संजय केळकर यांनी स्पष्ट केले.