अकृषिक कराच्या जाचातुन मुक्तता केल्याने हाऊसिंग फेडरेशनकडून आ. केळकर यांचा सत्कार..
ठाणे जिल्हा हाऊसिंग फेडरेशन आणि आमदार संजय केळकर यांच्या सातत्यपुर्ण पाठपुराव्यानंतर महायुती सरकारकडून अकृषिक कर पूर्णतः माफ करण्यात आला. त्यामुळे अकृषिक (एन ए) कराच्या जिझिया ओझ्याने हैराण झालेल्या गृहनिर्माण संस्थांची कराच्या या जाचातून मुक्तता झाली. या निमित्त महाराष्ट्रातील साडेचार कोटी रहिवाश्यांच्यावतीने ठाणे जिल्हा हाऊसिंग फेडरेशनने शनिवारी आ. संजय केळकर यांचा जाहिर सत्कार केला. हाऊसिंग फेडरेशनच्या कार्यालयात पार पडलेल्या या कार्यक्रमाला, हाऊसिंग फेडरेशनचे अध्यक्ष सीताराम राणे, भाजप ठाणे शहर उपाध्यक्ष महेश कदम, फेडरेशनच्या संचालक शैलजा गस्ते, विनोद देसाई, संतोष साळुंखे आणि ॲड.अल्केश कदम आदीसह रहिवाशी उपस्थित होते.
महाराष्ट्रात १ लाख २५ हजार गृहनिर्माण संस्था आहेत तर ठाणे जिल्ह्यात ३३ हजार आणि शहरात साडेचार हजार सोसायट्या आहेत. अकृषिक (एनए) कराच्या नोटीसांमुळे राज्यातील साडेचार कोटी रहिवासी हतबल झाले होते. हा एनए कर स्थगित करावा यासाठी ठाणे जिल्हा हाउसिंग फेडरेशन, महाराष्ट्र हाऊसिंग फेडरेशन, पुणे हाऊसिंग फेडरेशनच्या महाराष्ट्र राज्य गृहनिर्माण महासंघाने न्यायालयात जनहित याचिकाही दाखल केली होती. या बरोबरीने ठाणे शहराचे आमदार संजय केळकर यांनी विधीमंडळामध्ये तसेच, २०१८ ते २०२३ पर्यंत संबंधीत तीन मंत्र्यांकडे वारंवार बैठका घेऊन हा मुद्दा लावून धरला होता. एक घर आणि दोन कर हा जाच कशासाठी असा सवाल करीत सरकारकडे पाठपुरावा केल्यानंतर तत्कालीन महसुल मंत्री राधाकृष्ण विखे - पाटील यांनी अकृषिक कर रद्द करण्यासाठी समिती नेमुन एनए कर वसुलीला स्थगिती दिली होती. तर, नुकत्याच पार पडलेल्या बैठकीत महायुती सरकारने अकृषिक कर पूर्णतः माफ करण्याचा निर्णय घेतला. अखेर आ. संजय केळकर आणि हाऊसिंग फेडरेशनने केलेल्या अथक प्रयत्नांना यश आले. यानिमित्ताने हाऊसिंग फेडरेशनचे अध्यक्ष सीताराम राणे यांनी शनिवारी आ. संजय केळकर यांचा पुष्पगुच्छ आणि शाल देऊन जाहिर सत्कार केला.