मुंबई ( प्रतिनिकडून) राज्यातील २०१३ पूर्वी नियुक्त झालेल्या सर्व शिक्षकांना टीईटी परीक्षा अनिवार्य करु नये. १५ मार्च २०२५ चा संच मान्यता शासन निर्णय रद्द करुन जुन्या निकषाप्रमाणे संचमान्यता करण्यात यावी. शाळास्तरावरील शिक्षकांना दिली जाणारी ऑनलाईन अशैक्षणिक कामे बंद करावी. त्यासाठी स्वतंत्र यंत्रणा निर्माण करावी. आदी मागण्यांसाठी ५ डिसेंबर २०२५ रोजी सर्व शिक्षक संघटनांच्या वतीने महामोर्चा आणि शाळा बंद आंदोलन केले जाणार आहे. त्या आंदोलनात मुंबई शहर शिक्षक विकास मंडळाचे प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक विभागीय कार्यकर्ते आणि शिक्षक सहभागी होणार आहेत. असे सुतोवाच शिक्षक विकास मंडळाचे कार्यकारीणी सदस्य प्रा. डाॅ. विशाल कडणे यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना केले आहे.
शिक्षण विभागाने २० पेक्षा कमी पटसंख्येच्या शाळा बंद करण्याचा आदेश म्हणजे विद्यार्थ्यांच्या शिक्षण हक्क कायद्यावर गदा आहे. आणि त्यात कहर म्हणजे शिक्षण विभागाने अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन ५ डिसेंबर २०२५पर्यंत करण्याचे आदेश काढले आहेत. हे परिपत्रक म्हणजे शिक्षकांच्या आणि विद्यार्थ्यांच्या डोक्यावर टांगती तलवार आहे, अशी टीकाही त्यांनी केली आहे.
याशिवाय वरीष्ठ व निवडश्रेणीची अट रद्द करुन इतर शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे सरसकट 10:20:30 आश्वासित प्रगती योजना लागू करावी. शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची पदभरती तात्काळ सुरु करावी. शिक्षण संस्थांना वेतनेतर अनुदान सुरु करावे. आदी अनेक मागण्यांसाठी ५ डिसेंबर २०२५ रोजीच्या बंद मध्ये मुंबई शहर शिक्षक विकास मंडळ सहभागी होत आहे.