मर्जिया पठाण यांनी घेतली मालेगावातील अत्याचारपीडित मुलीचे कुटुंबिय आणि पोलीस उपअधीक्षकांची भेट**नराधमाला फासावर लटकवा; अधिवेशनात विषय चर्चेला घ्या - मर्जिया पठाण*


ठाणे - मालेगाव येथे तीन वर्षांच्या मुलीवर अत्याचार करून तिची हत्या करण्यात आली आहे. हे दुष्कृत्य करणाऱ्या नराधमास फासावर लटकवावे तसेच या प्रकरणी संसदेत आणि राज्याच्या विधिमंडळात चर्चा करून महिला अत्याचाराबाबत कठोर कायदा पारीत करावा, अशी मागणी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षाच्या राष्ट्रीय कार्याध्यक्षा मर्जिया शानू पठाण यांनी केली. दरम्यान,  मर्जाया पठाण यांनी पोलीस उपअधीक्षक (asp)  तेगबीर सिंह संधू (ips)  यांची भेट घेऊन नराधम आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी, याच अनुषंगाने आरोपपत्र तयार करावे, अशी मागणी केली .

मालेगावपासून नजीक असलेल्या एका गावात तीन वर्षांच्या चिमुरडीवर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आली होती. या घटनेचे पडसाद सर्वत्र उमटले असून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षाच्या राष्ट्रीय कार्याध्यक्षा मर्जिया शानू पठाण यांनी या पीडित मुलीच्या कुटुंबियांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. तसेच, पक्षाकडून सर्वतोपरी साह्य करण्याचे आश्वासन दिले. पीडित कुटुंबाची भेट घेतल्यानंतर मर्जिया पठाण यांनी स्थानिक पोलीस स्टेशन आणि पोलीस उपअधीक्षक (asp)  तेगबीर सिंह संधू (ips) यांची भेट घेऊन तपासाबाबत माहिती घेतली. 
या प्रसंगी त्या म्हणाल्या की, राज्यात महिला - मुलींवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ होऊ लागली आहे. जिथे असे अत्याचार होत असतात. तिथे पोहचून न्याय मिळवून देण्यासाठी आपण नेहमीच तत्पर असतो. आजमितीला देशात दर पंधरा मिनिटाला एका महिलेवर अत्याचार होत आहे. आपल्या देशात कडक कायदे असूनही केवळ न्यायदान उशिरा होत असल्याने अनेक घटनांमध्ये आरोपी मुक्त सुटत आहे. न्यायदानातील विलंबामुळे  न्याय नाकारला जात असल्याची भावना पीडितांमध्ये तयार होत आहे. त्यामुळेच मालेगाव घटनेतील आरोपपत्र तयार करताना कोणत्याही प्रकारची हयगय करू नये, अशी विनंती आपण पोलीस अधिकाऱ्यांना केली आहे. या नराधमाला असे कडक शासन झाले पाहिजे की यापुढे कुणाचीही असा गुन्हा करण्याची हिमंत होणार नाही. अशा घटना आपण सहन करणार नाही. जर, आरोपींना शिक्षा करण्यास यंत्रणा सक्षम नसेल तर आम्ही नराधमाला योग्य तो धडा शिकवू, असा इशाराही मर्जिया पठाण यांनी दिला.
Shahar Varta News
Shahar Varta News