ठाणे : ठाण्याची वाहतुक व्यवस्था अधिक सक्षम व्हावी यासाठी ठाण्यात राज्य शासनाच्या वतीने अनेक महत्वाकांशी प्रकल्प सुरु असून यापैकीच एक म्हणजे कोस्टल रोड प्रकल्प. मात्र हा प्रकल्प ठाण्यातील स्थानिक शेतकऱ्यांच्या मुळावर आला असून यामुळे अनेक शेतकरी भूमिहीन होणार आहे. शिवसेनेचे विभाग प्रमुख रवि घरत यांच्यासह बाधित शेतकऱ्यांनी मंगळवारी पालिका आयुक्त सौरभ राव यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान शेतकरी मालकी हक्काच्या कसत असलेल्या जमिनीचा ५० टक्के व सरकारी जमिनीवर कसत असल्यास २५ टक्के ताबा देण्यासोबतच मेट्रो कारशेड प्रमाणे आर्थिक मोबदला देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
वाघबीळ, भाईंदरपाडा, कोलशेत, बाळकूम अशा विविध प्ररिसरातील शेतकऱ्यांनी विभाग प्रमुख रवि घरत यांच्या नेतृत्वाखाली पालिका आयुक्त सौरभ राव यांची भेट घेतली. ठाणे महापालिका क्षेत्रातून वाहतुकीसाठी महत्वाचा असलेला कोस्टल रोड जात असून यामध्ये घोडबंदर येथील शेतकरी मोठ्या संख्येने बाधित होणार आहेत. पिढ्यानपिढ्या हे शेतकरी सरकारी जमिनी कसत असून १०० वर्षांपेक्षा अधिक वर्ष सरकारी जमिनीवर अतिक्रमण न होऊन देता त्या जमिनीवर प्रामाणिकपणे शेती करत आहे. त्यामुळे या जमिनीचे २५ टक्के टायटल आमच्या नावाने करा अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. भाईंदरपाडा या जमिनीवर गो एअरवेज चे टायटल आहे. मात्र या ठिकाणी आजपर्यंत भूमिपुत्रांनीच शेती केली आहे. कंपनी कधी चालू झाली नाही किंवा कोणी बघायला पण आले नाही. याचे संरक्षण शेतकऱ्यांनीच केले आहे त्यामुळे त्या जागेच्या मोबदल्यात ५० टक्के टायटल देण्याची मागणी करण्यात आली आहे. त्याच बरोबर मेट्रो कारशेडच्या धर्तीवर आर्थिक मोबदला देण्याची मागणी यावेळी विभाग प्रमुख रवि घरत आणि शेतकऱ्यांनी पालिका आयुक्तांकडे केली आहे.
शेतकऱ्यांच्या हक्का संदर्भात आम्ही परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची भेट घेतली असून त्यांनी आमची पालिका आयुक्त यांच्या सोबत भेट घालून दिली. पालिका आयुक्तांसोबत देखील सकारात्मक चर्चा झाली असून शेतकऱ्यांना नक्की न्याय मिळेल अशी अशा विभाग प्रमुख रवि घरत यांनी व्यक्त केली आहे.