ठाणे , दि. २ ( प्रतिनिधी ) - बी. डी.सोमाणी इंटरनॅशनल स्कूल मधील फ्रेंच विषयाचे प्राध्यापक प्रथमेश डोळे यांना साहित्य क्षेत्रातील अनुवाद या विभागासाठी शरद पवार इन्स्पायर फेलोशिप जाहीर करण्यात आली आहे. ५० हजार रुपयांची ही फेलोशिप असून मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटरच्या वतीने त्याची घोषणा करण्यात आली आहे .
प्रथमेश डोळे हे गेली पाच वर्षे अनुवादाच्या क्षेत्रात काम करीत असून मराठी , इंग्रजी व फ्रेंच भाषेतून काव्यलेखन करीत आहेत. फ्रान्समधील लेखिकेच्या चरित्रात्मक कादंबरीचे मराठीमध्ये ते भाषांतर करणार आहेत. १९४५ च्या युद्धानंतर फ्रान्समध्ये संघर्ष करून स्वतःचे दुकान थाटणार्या वडीलांचा कठोर प्रवास या कादंबरीत लेखिकेने मांडला आहे.
हे पुस्तक मराठीमध्ये प्रथमच भाषांतरीत होत असून त्यामुळे अनेकांना प्रेरणा मिळेल. रविवार १४ डिसेंबर रोजी यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये आयोजित केलेल्या सोहळ्यात प्रथमेश डोळे यांना इन्स्पायर फेलोशिप प्रदान केली जाणार आहे. यावेळी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार तसेच खासदार सुप्रिया सुळे यांच्यासह साहित्य क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत.