ठाणे - उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली मा. नगरसेवक विकास रेपाळे व माजी नगरसेविका सौ. नम्रता भोसले-जाधव यांच्या संकल्पनेतून व प्रयत्नाने कशिश पार्क येथे अद्यावत असे 'धर्मवीर आनंद दिघे वाचनालय' व 'अभ्यासिका' तयार करण्यात आलेले आहे. सदर वास्तुच्या विस्तारीकरणाचे लोकार्पण नुकतेच खासदार नरेश म्हस्के यांच्या शुभहस्ते संपन्न झाले.
धर्मवीर आनंद दिघे यांच्या प्रेरणेने ज्ञानाचा दीप प्रज्वलित करण्याचा तसेच मोकळ्या आभाळाखाली, प्रसन्न वातावरणात अभ्यासासाठी उत्तम वातावरण उपलब्ध करून देण्याचा विकास रेपाळे व नम्रता भोसले जाधव यांचा मानस आहे. याचसाठी `वाचनालय' व 'अभ्यासिका' यांची निर्मिती त्यांनी केली आहे.
विद्यार्थ्यांना ज्ञानार्जनाची प्रेरणा मिळावी तसेच वाचनाची गोडी वाढावी, यासाठीचा हा छोटासा प्रयत्न असून सर्व ठाणेकर विद्यार्थी व नागरिकांनी या वाचनालयाचा लाभ घ्यावा असे आवाहन विकास रेपाळे व नम्रता भोसले जाधव यांनी याप्रसंगी केले. लहानशा खोलीत अभ्यास करताना विद्यार्थ्यांना येणाऱ्या नितांत अडचणी डोळ्यासमोर ठेवून उभारलेल्या या अभ्यासिकेतून अभ्यास करत उज्ज्वल भविष्य घडवण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न आहे.
आशुतोष म्हस्के, जेष्ठ कवी अरुण म्हात्रे, माजी पोलीस अधिकारी काशिनाथ कचरे, आणि शिवसेना पदाधीकारी मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते.