ठाणे | १५ फेब्रुवारी २०२६
महाशिवरात्रीच्या पावन पर्वानिमित्त समन्वय प्रतिष्ठान, ‘भारतीय जनता पार्टी आध्यात्मिक समन्वय आघाडी, ठाणे शहर’ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित भव्य ‘होमात्मक लघुरुद्र अनुष्ठान’ कार्यक्रम ठाणे येथील छत्रपती शिवाजी महाराज मैदानावर मोठ्या भक्तिभावात आणि उत्साहात संपन्न झाला. या अनुष्ठानाचे आयोजन कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार तसेच समन्वय प्रतिष्ठान, ठाणेचे अध्यक्ष मा. ॲड. निरंजन डावखरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले.
कार्यक्रमास ठाणे शहर आमदार संजय केळकर, उपमहापौर श्री. कृष्णा पाटील, सर्व नगरसेवक, पदाधिकारी तसेच ठाणे जिल्ह्यातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. पुणे येथील केशव शंखनाद पथकाच्या मंगल शंखनादाने अनुष्ठानाची सुरुवात झाली. त्यानंतर बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या उज्जैनच्या महाकालेश्वर मंदिरातून आणलेल्या पवित्र ज्योतीने लघुरुद्र अनुष्ठानाचा प्रारंभ करण्यात आला.
या महायज्ञात तब्बल १५१ जोडप्यांनी सहभाग नोंदवत अनुष्ठान पूर्ण केले. वाल्मिकी, मातंग, बौद्ध, आदिवासी, पारधी, खाटिक, मुस्लिम चर्मकार, विश्वकर्मा आदी बहुजन समाजातील जोडप्यांसह विविध समाजघटकांचा सहभाग लक्षणीय होता. विशेष म्हणजे ख्रिश्चन धर्मातून हिंदू धर्मात धर्मांतरण केलेल्या चार जोडप्यांनीही अनुष्ठानात सहभाग घेतला. तसेच ओरिसा, आंध्र प्रदेश आणि केरळ राज्यांमधूनही भाविकांनी महायज्ञात सहभागी होत धार्मिक एकात्मतेचा संदेश दिला. विविध धर्म, समाजघटक आणि प्रांतातील नागरिक या अनुष्ठानासाठी ठाण्यात एकवटले, हे या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य ठरले.
अनुष्ठानात सहभागी सर्व जोडप्यांचा सन्मान मा. आमदार ॲड. निरंजन डावखरे यांच्या हस्ते स्मृतीचिन्ह देऊन करण्यात आला.
संध्याकाळी महाशिवरात्रीनिमित्त विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. उत्तर भारतीय कलाकारांनी सादर केलेले शिवतांडव आणि अघोरी नृत्य सादरीकरणाने उपस्थितांची मने जिंकली आणि कार्यक्रमाची सांगता भक्तिमय वातावरणात झाली. ठाणेकरांनी या कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
यावेळी बोलताना मा. आमदार ॲड. निरंजन डावखरे यांनी सांगितले की, “महाशिवरात्रीचा उत्सव हा केवळ धार्मिक सोहळा नसून समाजातील सर्व घटकांना एकत्र आणणारा आणि समन्वयाचा संदेश देणारा आहे. समन्वय प्रतिष्ठानच्या माध्यमातून सामाजिक, सांस्कृतिक आणि आध्यात्मिक एकात्मतेसाठी असे उपक्रम पुढेही सातत्याने राबविले जातील.”
या प्रसंगी मा. आचार्यजी आशिषकुमार जानी यांनी पौराहित्य करत संपूर्ण विधी विधिपूर्वक संपन्न केला. आयोजन यशस्वी करण्यासाठी समन्वय प्रतिष्ठानचे श्री. रवी काळे व सहकारी, तसेच भाजप आध्यात्मिक समन्वय आघाडीच्या संयोजिका सौ. अश्विनी पटवर्धन व त्यांच्या सहकाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.