भिवंडी | दि. २० फेब्रुवारी २०२६
मुनीसुव्रत अर्हम ग्रुपतर्फे उभारण्यात आलेल्या अत्याधुनिक ‘मुनीसुव्रत टेक्सटाईल पार्क’चे उद्घाटन वस्रोद्योग मंत्री श्री. संजय सावकारे यांच्या हस्ते व भाजपा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष श्री. रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते मुनीसुव्रत टेक्सटाईल पार्क च्या कार्यालयाचे उद्घाटन संपन्न झाले. यावेळी कपिल पाटील व उद्योगक्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते. भिवंडीच्या वस्त्रोद्योगाला आधुनिक पायाभूत सुविधा आणि जागतिक दर्जाची स्पर्धात्मकता देणारा हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प उद्योग क्षेत्रासाठी नवी दिशा देणारा ठरला. उद्घाटन सोहळ्यास माजी केंद्रीय राज्यमंत्री श्री. कपिल पाटील यांचीही विशेष उपस्थिती होती.
यावेळी मान्यवरांनी भिवंडीच्या पारंपरिक वस्त्रोद्योगाच्या समृद्ध वारशाचा उल्लेख करत आधुनिक तंत्रज्ञान, सुसज्ज औद्योगिक संकुल आणि एकात्मिक सुविधांमुळे उद्योगाला नवे बळ मिळणार असल्याचे सांगितले. या टेक्सटाईल पार्कमुळे उत्पादनक्षमता वाढ, निर्यात वृद्धी आणि मोठ्या प्रमाणावर रोजगारनिर्मिती साध्य होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.
कार्यक्रमात आदरणीय पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली राबविण्यात येणाऱ्या ‘मेक इन इंडिया’ व ‘पीएलआय योजना’सारख्या उपक्रमांचा उल्लेख करण्यात आला. केंद्रीय अर्थमंत्री श्रीमती निर्मला सीतारामन यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पात कापड उद्योगाला दिलेले प्राधान्य आणि भिवंडीचा विशेष उल्लेख हा या भागाच्या औद्योगिक क्षमतेचा गौरव असल्याचेही नमूद करण्यात आले.
वस्रोद्योग मंत्री श्री. संजय सावकारे म्हणाले, “भिवंडीचा वस्त्रोद्योग हा देशाच्या आर्थिक प्रगतीचा महत्त्वाचा घटक आहे. ‘मुनीसुव्रत टेक्सटाईल पार्क’सारख्या प्रकल्पांमुळे स्थानिक उद्योजकांना दर्जेदार सुविधा उपलब्ध होतील आणि ‘मेक इन इंडिया’ला अधिक गती मिळेल. केंद्र आणि राज्य सरकार वस्त्रोद्योगाच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध आहे.”
प्रदेशाध्यक्ष श्री. रवींद्र चव्हाण म्हणाले, “भिवंडीच्या औद्योगिक क्षमतेवर आमचा पूर्ण विश्वास आहे. आधुनिक सुविधा आणि उद्योजकांचा उत्साह यामुळे हा प्रकल्प राज्यातील उद्योग क्षेत्रासाठी आदर्श ठरेल. रोजगारनिर्मिती आणि स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना देणारा हा टेक्सटाईल पार्क विकासाच्या नव्या पर्वाची सुरुवात ठरेल.”
मुनीसुव्रत टेक्सटाईल पार्कचे संचालक श्री. पुनीत गोसरानी यांनी प्रकल्पाच्या संकल्पनेविषयी माहिती देताना सांगितले की, अत्याधुनिक यंत्रसामग्री, एकात्मिक सुविधा आणि नियोजनबद्ध औद्योगिक रचनेमुळे उद्योजकांना जागतिक दर्जाची स्पर्धात्मकता मिळेल. पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री श्री. देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वात होत असलेल्या धोरणात्मक सुधारणांमुळे भिवंडीला वस्त्रोद्योगाच्या नकाशावर नवे स्थान मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
कार्यक्रमास उद्योजक, व्यापारी, उद्योग क्षेत्रातील प्रतिनिधी आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.