शैक्षणिक गुणवत्ता न्यारी;ग्रामीणची पोरं लै भारी !
* राष्ट्रीय पातळीवर अनुराधा बुधवंत भारतात अव्वल *
कसारा - देशपातळीवर नुकताच झालेल्या अखिल भारतीय सैनिक स्कूल प्रवेश परीक्षेत पाचवीत शिक्षण घेणाऱ्या अनुराधा अमोल बुधवंत विद्यार्थिनीने भारतात अव्वल स्थान मिळवत महाराष्ट्र राज्यासह ठाणे आणि नाशिक जिल्ह्याची मान उंचावली आहे.पहिल्यांदाच अनुराधाच्या माध्यमातून देशात महाराष्ट्र राज्याचा झेंडा फडकला आहे.राष्ट्रीय पातळीवर ऐतिहासिक कामगिरीची नोंद झाल्याने ग्रामीण भागात तिच्या गुणवत्ता कामगिरीचे कौतुक केले जात आहे.
सध्या'ग्रामीण भागातील गुणवत्ता न्यारी,अखिल भारतीय सैनिक स्कूल परीक्षेत ग्रामीण पोरं लै भारी'असे हसते खेळते आणि अभिमानास्पद चित्र अनुराधाने आपल्या गुणवत्तेतून ग्रामीण भागात उभे केले आहे. देशपातळीवर सैनिक स्कूल प्रवेश प्रक्रिया परीक्षा घेण्यात आली होती.या परीक्षेसाठी देशभरातून १ लाख ३४ हजार विद्यार्थी बसले होते.३०० गुणांची घेण्यात आलेल्या परीक्षेत अनुराधा हिने २९६ गुण मिळवून देशात अव्वल स्थान मिळवले आहे.तिचा जुळा भाऊ अनिरुद्ध याने देखील २८६ गुण मिळवत दैदिप्यमान यश संपादन केले आहे.एकाच कुटुंबातील या दोन जुळ्या भावंडांनी अत्यंत कठीण परिस्थितीत राष्ट्रीय पातळीवर घेतलेली झेप महाराष्ट्र राज्यासाठी कौतुकास्पद आहे.
अनुराधा आणि अनिरुद्ध यांचे वडील अमोल बुधवंत हे ठाणे जिल्ह्यातील कसारा केंद्रांतर्गत असलेल्या जिल्हा परिषद शिदवाडी या दुर्गम भागात शिक्षक म्हणून कार्यरत आहे,तर आई इगतपुरी महसूल विभागात कर्तव्य बजावत आहे.अहिल्यानगर जिल्ह्यातील मूळ गाव असलेल्या शिरापूर जिल्ह्यासह कसारा,पाथर्डी,इगतपुरी परिसरात जल्लोषाचे वातावरण आहे.भविष्यात भारतीय संरक्षण दलात अधिकारी बनून देशसेवा करण्याचे स्वप्न उराशी बाळगले असल्याची प्रतिक्रिया अनुराधा आणि अनिरुद्ध विद्यार्थ्यांनी व्यक्त केली आहे.