ठाणे : नाबाद अर्धशतकी खेळीसह दोन फलंदाज बाद करणाऱ्या मंथन पेडणेकरच्या अष्टपैलू खेळामुळे टेलिपरफॉर्मन्स ग्लोबल सर्व्हिसेस संघाने टाइम्स ऑफ इंडिया स्पोर्ट्स क्लबचा १० गडी राखून दणदणीत पराभव करत सुवर्णमहोत्सवी ठाणेवैभव आंतर कार्यालयीन क्रिकेट स्पर्धेच्या ब गटात आगेकूच कायम राखली. सुरुवातीला टाईम्स ऑफ इंडिया स्पोर्ट्स क्लबला १०० धावांत गुंडाळल्यावर मंथनने आयुष मिश्राच्या साथीने नाबाद शतकी भागीदारी करत संघाला विजय मिळवून दिला.
सलामीला आलेल्या प्रसाद पाटीलच्या ४०धावांचा अपवाद वगळता टाईम्स ऑफ इंडियाच्या एकाही फलंदाजाला खेळपट्टीवर उभे राहता आले नाही. प्रसाद नंतर अमेय म्हांब्रेने १३ धावा बनवल्या. प्रतिस्पर्ध्यांना झटपट गुंडाळताना शशांक मिश्राने चार, अबू तहा हाश्मीने तीन आणि मंथनने दोन फलंदाज बाद केले. त्यानंतर मंथन आणि आयुष मिश्राने नाबाद राहत १०२ धावांसह संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. मंथनने नाबाद ५० आणि आयुषने नाबाद ४० धावा केल्या.
संक्षिप्त धावफलक : टाईम्स ऑफ इंडिया स्पोर्ट्स क्लब: २०.४ षटकात सर्वबाद १०० ( प्रसाद पाटील ४०, अमेय म्हांब्रे १३, शशांक मिश्रा ३.४-१५-४, अबू तहा हाश्मी ७-१-२२-३, मंथन पेडणेकर ३-२५-२) पराभूत विरुद्ध टेलिपरफॉर्मन्स ग्लोबल सर्व्हिसेस: १३.२ षटकात बिनबाद १०२( मंथन पेडणेकर नाबाद ५०, आयुष मिश्रा नाबाद ४०).