हाऊसिंग फेडरेशनच्यावतीने मातृशक्तीचा गौरव ; महिलांनी समाजकार्यात अधिक सक्षम होण्याचे महापौरांचे आवाहन



ठाणे, दि.१३ (प्रतिनिधी)
   जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने मातृशक्तीचा सन्मान करणारा विशेष आणि उत्साहपूर्ण सोहळा गुरुवारी ठाण्यात पार पडला. ठाणे डिस्ट्रिक्ट को- ऑपरेटिव्ह हाऊसिंग फेडरेशन लिमिटेडच्या वतीने आयोजित या कार्यक्रमात ठाणे महापालिकेच्या महापौर शर्मिला पिंपळोलकर यांनी महिलांच्या सक्षमीकरणाचा संदेश देत समाजकार्यात महिलांनी अधिक बळकट व्हावे, अशी प्रेरणादायी हाक दिली.
   ठाणे डिस्ट्रिक्ट को.ऑप. हाउसिंग फेडरेशनच्यावतीने जागतिक महिला दिनानिमित्त मातृशक्तीचा सन्मान करणारा विशेष सोहळा ठाणे महापालिकेच्या कै. नरेंद्र बल्लाळ सभागृहात गुरुवारी पार पडला. या सोहळ्याला हाऊसिंग फेडरेशनचे अध्यक्ष व भाजपचे नगरसेवक सीताराम बाजी राणे, महापौर शर्मिला पिंपळोलकर, उपमहापौर कृष्णा पाटील, ठाणे महापालिकेचे आयुक्त सौरभ राव, ठाणे जिल्ह्याच्या अतिरिक्त जिल्हाधिकारी रेवती गायकर यांच्यासह ज्येष्ठ नगरसेविका प्रमिला केणी, परिषा सरनाईक, मृणाल पेंडसे आदीसह नवनिर्वाचित नगरसेविकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
     या कार्यक्रमात समाज विकास व महिला बाल विकास विभागाच्या उपआयुक्त अनघा कदम, शिक्षण, भांडार व परवाना विभागाच्या उपआयुक्त डॉ. मिताली संचेती तसेच एसआरए प्राधिकरण अधिकारी व ठामपा क्रीडा विभागाच्या उपायुक्त मिनल पालांडे यांच्यासह नुकत्याच पार पडलेल्या ठाणे महापालिका निवडणुकीमध्ये निवडून आलेल्या सर्व नगरसेविकांचा तसेच फेडरेशनच्या महिला कर्मचाऱ्यांचा सन्मानचिन्ह व भेटवस्तू देऊन गौरव करण्यात आला. यावेळी नगरसेविका परिषा सरनाईक यांनी करिअर आणि कुटुंब ही एकाच गाडीची दोन चाके असल्याचे सांगत आपल्या आई आणि स्नुषांच्या आठवणींना उजाळा दिला. तसेच हाऊसिंग सोसायटीच्या समित्यांमध्येही महिलांना सन्मानपूर्वक पदांची संधी मिळावी, अशी मागणी केली. नगरसेविका प्रमिला केणी आणि मृणाल पेंडसे यांनीही त्यांच्या मागणीला पाठिंबा दर्शवित हाऊसिंग फेडरेशनचे अध्यक्ष सीताराम राणे यांनी महिलांना संधी मिळावी, यासाठी पुढाकार घ्यावा, अशी सूचना केली. ठाणे जिल्ह्याच्या अतिरिक्त जिल्हाधिकारी रेवती गायकर यांनी महिलांना संदेश देताना सांगितले की, प्रशासन हे यंत्रणा असते, तर लोकप्रतिनिधी हे जनतेचे प्रतिनिधित्व करतात. तेव्हा, समाजाचे प्रतिनिधित्व करताना महिलांनी कोणत्याही क्षेत्रात कमी पडू नये, असे आवाहन केले.या कार्यक्रमाला आवर्जुन उपस्थित राहुन आयुक्त सौरभ राव यांनी सर्व नगरसेविका आणि सत्कारमूर्तीना शुभेच्छा दिल्या.तर, प्रारंभी फेडरेशनचे अध्यक्ष सीताराम राणे यांनी हाऊसिंग फेडरेशन गेली अनेक वर्षे राबवित असलेल्या विविध कार्यक्रमांचा आणि महिला सक्षमीकरणाच्या धोरणाचा उहापोह करुन भेट म्हणून प्रत्येक भगिनीला सोसायटी मार्गदर्शिका दिल्याचे सांगितले. दरम्यान, खुमासदार गप्पागोष्टी आणि प्रश्नोत्तराच्या कार्यक्रमाने रंगत आणलेल्या या समारोहाचे नेटके निवेदन साधना जोशी यांनी आपल्या ओघवत्या शैलीत केले. सोहळ्याच्या समारोपानंतर हाऊसिंग फेडरेशनतर्फे महापालिकेच्या हिरव्यागार लॉनवर उभारलेल्या आकर्षक सेल्फी पॉईंटवर सर्व नगरसेविकांनी महापौर शर्मिला पिंपळोलकर यांच्यासोबत सेल्फी काढत आनंद लुटला.

 चौकट - “स्त्रीचे कुटुंबात जितके महत्व, तितकेच समाजातही - महापौर पिंपळोलकर”

    विविध क्षेत्रांत पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून आज स्त्रिया काम करत असल्या तरी ग्रामीण भागातील महिलांची परिस्थिती अजूनही आव्हानात्मक आहे, त्यामुळे ग्रामीण क्षेत्रात महिला सक्षमीकरणाची गरज असल्याचे महापौर शर्मिला पिंपळोलकर यांनी म्हटले. 'ठाणे' हे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे घर असून त्यांच्यावर संपुर्ण महाराष्ट्राची जबाबदारी असल्याने त्यांनी आम्हा भागिनींवर ठाण्याची जबाबदारी सोपवली आहे. तेव्हा, कुटुंबात जितके स्त्रीचे महत्त्व तितकेच समाजातही महत्व असल्याचे सांगत महापौर पिंपळोलकर यांनी प्रत्येक क्षेत्रात महिलांनी पुढे येण्याचे आवाहन केले.

Shahar Varta News
Shahar Varta News