ठाण्यातील प्रख्यात नुरी बाबा दर्ग्यात अवैध वृक्षतोड* *स्थानिकांनी भंडाफोड केल्यानंतर लोकप्रतिनिधींनी उठवला आवाज


ठाणे, ता.०४ (प्रतिनिधी)
  शेकडो वर्ष प्राचीन असलेल्या ठाण्यातील चंदनवाडी परिसरातील हजरत नुरी बाबा दरगाह ट्रस्टच्या आवारातील १० भलेमोठे वृक्ष शनिवारी विनापरवाना तोडण्यात आले. ही अवैध वृक्षतोड निदर्शनास येताच स्थानिक रहिवाश्यांनी या वृक्ष कत्तलीला विरोध दर्शविला. त्यानंतर याप्रकरणी स्थानिक शिवसेना नगरसेवक राजेश मोरे तसेच शिवसेना - भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी बुधवारी सायंकाळी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. तसेच, ठाणे महापालिकेसह पोलीस प्रशासनाने या वृक्षतोडीची चौकशी करून तातडीने कारवाई करण्याची आग्रही मागणी केली आहे.
   ठाणे पश्चिमेकडील मखमली तलावाच्या शेजारी असलेला नुरी बाबा दर्गाह हा मुस्लिम धर्मीयांसोबतच हिंदू इतर धर्मिंयाचेदेखील श्रद्धास्थान आहे. नुरी बाबा यांच्या नावाने प्रसिद्ध असलेल्या या दर्ग्यामध्ये नुरी बाबा यांची समाधी आहे. या दर्ग्या शेजारील मोकळ्या जागेतील चार अशोका वृक्ष, दोन सुपारीची झाडे, एक कोकम, दोन नारळाची झाडे, दोन आंबा वृक्ष असे एकुण १० वृक्ष शनिवारी (ता.२८ फेब्रु.) अवैधरित्या बुंध्यापासुन तोडण्यात आल्याचे स्थानिकांच्या निदर्शनास आले. त्यांनी ही बाब स्थानिक लोकप्रतिनिधीना कळवली.त्यानुसार, शिवसेना नगरसेवक राजेश मोरे, भाजपचे प्रदेश शेडगे यांसह शिवसेना - भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी बुधवारी प्रसारमाध्यमांसह प्रत्यक्ष पाहणी केली. हे कृत्य नुरी बाबा दरगाह ट्रस्टचे पदाधिकारी व नुरी कुटुंबियापैकी असल्याचा आरोप करून महापालिका प्रशासन तसेच पोलीसांनी कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

  - *ठामपा वृक्षप्राधिकरणने ट्रस्टला बजावली नोटीस* 

   नुरी बाबा दरगाह येथे एकुण १० वृक्ष अवैधरित्या बुंध्यापासुन तोडण्यात आल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर ठाणे महापालिकेच्या वृक्ष प्राधिकरण विभागाचे उद्यान निरिक्षक कृष्णनाथ धावडे यांनी तातडीने नुरीबाबा दर्गाचे व्यवस्थापक यांना नोटीस बजावून खुलासा मागवला आहे. तसेच, महाराष्ट्र (नागरी क्षेत्र) झाडांचे संरक्षण व जतन अधिनियम, १९७५ चे कलम २१' (१) व (२) तरतूदीचे उल्लंघन झालेले असून अधिनियमानुसार नुरी बाबा दरगाह ट्रस्टचे व्यवस्थापक हे व्यक्तीशः जबाबदार असल्याचे स्पष्ट होत आहेत. तेव्हा, दंड अथवा कारावासाच्या कारवाईस पात्र ठरत असल्याचे उद्यान निरिक्षक धावडे यांनी म्हटले आहे.
Shahar Varta News
Shahar Varta News