सागर कारिवडेकर करोडोंच्या गुंतवणुकीसह फरार



ठाणे (प्रतिनिधी) दि. 23 फेब्रुवारी
         ठाणे शहरातील व्यावसायिक श्री सचिन राणे आणि सौ प्रिती राणे या दांपत्यासह त्यांच्या ओळखीमधील सुमारे 1200 गुंतवणुकदारांना सुमारे सव्वाशे कोटी रूपयांना चुना लावून सागर कारिवडेकर नामक भामट्याने पळ काढला असल्याची माहिती प्राप्त झाली आहे.
         मिळालेल्या माहितीनुसार, राणे दांपत्य ठाण्यात कोरोना काळापासून शेअर ट्रेडिंग प्रशिक्षण वर्ग यशस्वीपणे चालवित आहेत. त्यांचे संपूर्ण महाराष्ट्रात अनेक विद्यार्थी असून, अनेकांना त्यांच्या ज्ञानाचा आर्थिक फायदा झाला आहे. याचा गैरफायदा घेऊन, सावंतवाडी येथील सागर कारिवडेकर या इसमाने, राणे यांच्या संपर्कातील गुंतवणुकदारांना शेअर मार्केटमधून मोठ्या परताव्याचे आमिष दाखवले. गेली तीन वर्षे त्याने घेतलेल्या गुंतवणुकीच्या बदल्यात चांगला परतावादेखील दिला. यातून अनेक गुंतवणूकदारांचे मुद्दल वसूल होऊन त्यांना दुप्पट आर्थिक फायदादेखील झाल्याची उदाहरणे आहेत. या सर्व परिस्थितीमुळे गुंतवणुकदारांनी सागर कारिवडेकर याच्यावर विश्वास ठेवला आणि आणखी मोठ्या रक्कमेची गुंतवणूक केली. ही गुंतवणूक गोळा करण्यासाठी सागर कारिवडेकर हा ठाणे येथे सचिन राणे यांच्या कार्यालयात मित्रत्वाच्या नात्याने बसून व्यवहार करीत असे. सर्व गुंतवणुकदारांच्या ठेवी सागर कारिवडेकर याच्याच खात्यात जमा असून, सचिन राणे अथवा त्यांचे कुटुंबिय या गुंतवणुकीचे लाभार्थी नाहीत. उलट, सचिन राणे कुटुंबियांकडूनही सागर कारिवडेकर याने ठेवी घेतल्या आणि त्याबदल्यात परतावेदेखील दिले आहेत.
         मोठ्या प्रमाणावर गुंतवणुकीची रक्कम गोळा झाल्यानंतर सागर कारिवडेकर याने सुमारे सहा महिन्यांपासून परतावा देणे बंद केले आणि पैसे परत देण्यासही तो टाळाटाळ करू लागला. सुमारे वर्षभरापासून आपली गुंतवणूक परत मिळत नसल्याचे लक्षात आल्यानंतर आणि सागर कारिवडेकरचा संपर्क तुटल्यानंतर गुंतवणुकदार सचिन राणे व प्रिती राणे यांना जाब विचारू लागले. त्यांच्या कार्यालयात ठाण मांडून बसणे, अनेकदा फोनवर व प्रत्यक्ष चौकशी करणे इत्यादी प्रकारांमुळे राणे कुटुंबियांना मानसिक त्रास झाला व दहशतीचाही सामना करावा लागला. मात्र याबाबतीत गुंतवणुकदारांशी व्यक्तिगत संबंध जपण्यासाठी राणे कुटुंबियांकडून गुंतवणुकदारांविरोधात आजअखेरपर्यंत कोणतीही तक्रार दाखल करण्यात आलेली नाही.
        सचिन राणे यांच्यावरील गुंतवणुकदारांचा दबाव इतका होता की त्यांनी अखेर सागर कारिवडेकर जी गुंतवणूक घेऊन फरार झाला ती परत देण्यासाठीचा करारदेखील नाईलाजास्तव सुमारे दोन महिन्यांपूर्वी केला. हा करार पूर्णपणे गुंतवणुकदारांच्या दबाव व दहशतीखाली झाल्याचे सिद्ध करणारे व्हिडिओ फुटेज राणे यांच्याकडे आहे.
         यादरम्यान, काही गुंतवणूकदारांकडून आर्थिक फसवणूक झाल्याबद्दल ठाणे पोलीसात तसेच इतरही ठिकाणी तक्रारी दाखल झाल्या. याबाबतीत आर्थिक गुन्हे शाखेकडूनदेखील तपास सुरू आहे आणि या प्रकरणातील सर्व दस्तऐवज राणे यांनी पोलीसांकडे सुपूर्द केले आहेत. फरार असलेला सागर कारिवडेकर आजमितीस कोणाच्याही संपर्काबाहेर आहे. त्याला पोलीसांकडून अनेकदा चौकशीकामी बोलाविण्यात आले मात्र तो प्रत्यक्ष न येता त्याच्या वकीलामार्फतच तो पोलीस चौकशीदेखील टाळत आहे. गुंतवणूकदारांनी सचिन राणे यांचा छळ करावा आणि त्या दबावाखाली राणे यांनी प्रसंगी कर्जबाजारी होऊन गुंतवणुकदारांचे पैसे परत द्यावेत म्हणजे सर्व रक्कम आपल्याला हडप करता येईल असा सागर कारिवडेकर याचा डाव असल्याबाबत सचिन राणे यांना आता संशय येऊ लागला आहे. 
        या सर्व प्रकारात सागर कारिवडेकर याच्याकडून हस्तेपरहस्ते आरोप करण्यात येत आहे की सचिन राणे कुटुंबियांना या सर्व प्रकारात बरीच रक्कम त्याने कमिशन व इतर स्वरूपात दिली. या आधारावर काही वृत्तपत्रे आणि डिजीटल माध्यमांतून राणेंची बदनामी करणारी व दिशाभूल करणारी माहिती प्रसिद्ध केली गेली. प्रत्यक्षात राणे कुटुंबियांना सागर कारिवडेकर याच्याकडून राणे यांनीच इतर गुंतवणूकदारांप्रमाणेच केलेली गुंतवणूक रक्कम आणि तिचे कायदेशीर परतावे याशिवाय अन्य कोणतीही जादा रक्कम प्राप्त नाही हे आजपर्यंतच्या पोलीस तपासातही दस्तऐवजांसह राणे कुटुंबियांकडून स्पष्ट करण्यात आले आहे. याविरोधात परिस्थिती असल्याबाबत कोणतेही पुरावे दस्तऐवज सागर राणे अथवा इतर कोणीही आजअखेरपर्यंत देऊ शकलेले नाही हे वास्तव आहे.
           या प्रकरणात सचिन राणे यांच्याकडून प्राप्तिकर खात्याचीही फसवणूक केली गेली असादेखील आरोप काही माध्यमांनी बेजबाबदारपणे व अर्धवट व एकतर्फी माहितीवरून केला असून प्रत्यक्षात त्यांच्या प्राप्तिकर अदायगीच्या अनुषंगाने काही सेवापुरवठादाराकडून केल्या गेलेल्या फसवणुकीबाबत व राणे यांच्या झालेल्या आर्थिक नुकसानीबाबत मा. न्यायालयात राणे यांनी दाखल केलेली तक्रार प्रलंबित आहे.
         या प्रकरणातील सर्व गुंतवणुकदार हे सागर कारिवडेकर फरार अथवा बेपत्ता असल्याने हवालदिल झाले आहेत आणि राणे कुटुंबियांवर आरोप करून आपले पैसे वसूल करता येतील असे वाटल्यावरून काही गुंतवणूकदारांकडून पोलीसात तक्रारी करण्याचे प्रकार झाले आहेत. मात्र या तक्रारींमधे तथ्य नसल्याचे सचिन राणे यांचे म्हणणे असून गुंतवणुकदारांनी सागर कारिवडेकर याला शोधण्यासाठी त्यांना सहकार्य करून आपले पैसे परत मिळवावेत यासाठी संयम ठेवावा असा आवाहन सचिन राणे यांनी केले आहे. सर्व गुंतवणुकदारांप्रति सचिन राणे कुटुंबियांकडून आजअखेरपर्यंत सहानुभूतीपूर्वक व्यवहार केला गेला आहे त्याचा मान ठेवून सर्वांनी फरार सागर कारिवडेकर याला शोधून प्रसंगी त्याच्यावर कठोर कायदेशीर कारवाई करण्यासाठी सचिन राणे कुटुंबियांसोबत रहावे आणि या सर्व प्रकाराबाबत प्रसारमाध्यमांनीही जबाबदारीने दोन्ही बाजू समजून घेऊन पुराव्यांसह हे प्रकरण जनतेसमोर मांडावे असे आवाहन सचिन राणे व प्रिती राणे यांच्याकडून करण्यात आले आहे. सागर कारिवडेकर यालाही सचिन राणे यांच्याकडून आवाहन करण्यात येत हे की त्याने सदर गुंतवणूक कुठे आहे आणि ती कशाप्रकारे तो परत देणार आहे याबाबतीत ऑनलाईन ऑफलाईन स्वरूपात प्रत्यक्ष समोर येऊन गुंतवणुकदारांना समजावून सांगावे जेणेकरून सचिन राणे कुटुंबियांचा मानसिक, शारिरीक व आर्थिक छळ थांबेल.
Shahar Varta News
Shahar Varta News