येऊरमधील अनधिकृत बंगले पुन्हा चर्चेतअनधिकृत नळजोडणी, महिन्याला हजारो रुपयांची कमाई असणाऱ्या बंगल्याची वन विभाग आणि महापालिकेकडे कागदोपत्री नोंदच नाही


ठाणे : येऊर आणि अनधिकृत बंगले यांची सांगड जुनीच आहे.  अनधिकृत नळ जोडणी, स्विमिंग पूल आणि महिन्याला हजारो रुपयांची कमाई करून देणाऱ्या बंगल्याची महापालिका सोडाच पण आदिवासींच्या वन जमिनीवर बांधलेल्या बंगल्याची वन विभागाकडेही कुठलीही कागदोपत्री नोंदच नसल्याचं प्रकरण उघडकीस आले आहे.
सर्वश्री गणेश टाक, गौतम मोरे, संजय पडवळ आणि हितेश राठोड या चौघा मित्रांनी २०१०-११ दरम्यान वन विभाग शेणाचा पाडा येथील जागा भूमापन क्र न स ७ उपविभाग १५(७/१७) ही १० गुंठे  जागा विकत घेतली होती. त्यानंतर काही वर्षांनी गणेश टाकने हितेश राठोडला त्याचे पैसे परत दिले. यादरम्यान घेतलेल्या जमिनीत भराव टाकून त्याठिकाणी बोअर वेल, वृक्षारोपण केले होते. नंतर गणेश टाकने इतर दोघांना डावलून त्याठिकाणी जलतरण तलाव असलेल्या हेरंब फार्म नावाचे पक्के अनधिकृत बांधकाम केले. विशेष म्हणजे ठाणे महापालिकेच्या पाणी विभागाचा कंत्राटदार असलेल्या गणेश टाकने या फॉर्ममध्ये १इंची पाण्याची पाईप लाईनही जोडून घेतली. बेकायदेशीर असलेला हा फॉर्म शनिवार - रविवार भाड्याने देऊन महिन्याला हजारो रुपयांची कमाई करत आहे. या बंगल्यासंदर्भात प्रशासनाकडे विचारणा केली असता, या बंगल्याची आमच्याकडे कुठल्याही प्रकारची नोंद नसल्याचे ठाणे महापालिका आणि वन विभागाने लिहून दिले आहे. महापालिकेचा हजारो रुपयांचा महसूल बुडवणारा गणेश टाक हा महापालिकेचा कंत्राटदार असल्याने त्या बंगल्यावर कारवाई होत नसल्याचे बोलले जात आहे.
Shahar Varta News
Shahar Varta News