ठाणे, दि. १३ (प्रतिनिधी)
ठाण्याच्या वागळे इस्टेट प्रभाग क्रमांक १८ मधील दुर्लक्षित आणि गाळाने भरलेल्या जुन्या विहिरींचे पुनरुज्जीवन करून स्वच्छ पिण्याच्या पाण्याचा पर्यायी स्रोत बनवाव्यात, अशी मागणी शिवसेनेचे (शिंदे गट) कार्यसम्राट नगरसेवक दीपक वेतकर यांनी ठाणे महापालिकेचे आयुक्त सौरभ राव यांच्याकडे केली आहे. विहिरींची शास्त्रोक्त पद्धतीने साफसफाई, गाळ काढणे आणि अत्याधुनिक जलशुद्धीकरण यंत्रणा बसविण्याची महत्वपूर्ण सुचनाही नगरसेवक वेतकर यांनी निवेदनाद्वारे केली आहे.
ठाणे महापालिका क्षेत्रात विहिरींच्या पुनरुज्जीवनाचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प राबविण्यात येत असून, त्याअंतर्गत वागळे इस्टेट प्रभाग क्रमांक १८ मधील सर्व विहिरींचा समावेश करावा, अशी विनंती राज्याचे उपमुख्यमंत्री शिवसेना मुख्य नेते एकनाथ शिंदे व आमदार रविंद्र फाटक यांच्या मार्गदर्शनाखाली नगरसेवक श्री. दीपक वेतकर यांनी आयुक्त राव यांच्याकडे केली आहे. परिसरातील अनेक विहिरी सध्या दुर्लक्षित अवस्थेत असून त्यामध्ये मोठ्या प्रमाणात गाळ साचला आहे. नियमित देखभाल आणि साफसफाईच्या अभावामुळे हे जलस्रोत दुर्लक्षित असल्याचे त्यांनी निदर्शनास आणले आहे.
या प्रकल्पांतर्गत विहिरींची शास्त्रोक्त पद्धतीने साफसफाई, गाळ काढणे, संरक्षक जाळ्या बसविणे, भिंतींचे मजबुतीकरण करणे तसेच, सांडपाणी मिसळण्यास प्रतिबंध करणाऱ्या उपाययोजना राबविण्याची आवश्यकता त्यांनी व्यक्त केली. या सोबतच विहिरींवर अत्याधुनिक जलशुद्धीकरण यंत्रणा बसविल्यास नागरिकांना स्वच्छ आणि शुद्ध पिण्याचे पाणी उपलब्ध होऊ शकणार असल्याकडे त्यांनी लक्ष वेधले आहे. अल निनोचे संकट लक्षात घेऊन त्यावर प्रभावी उपाययोजना करण्या बरोबरच वाढत्या पाणीटंचाई करीता विहिरींचे पुनरुज्जीवन ही काळाची गरज असल्याचे मत नगरसेवक वेतकर यांनी व्यक्त केले. यामुळे नागरिकांना पाण्याचा पर्यायी स्रोत उपलब्ध होऊन भूजल पातळी वाढण्यास मदत होईल आणि नैसर्गिक जलस्रोतांचे देखील उत्तम प्रकारे संवर्धन होईल. तेव्हा, वागळे इस्टेट प्रभाग क्रमांक १८ मधील सर्व विहिरींचे तातडीने सर्वेक्षण करून विहिरींच्या पुनरुज्जीवनाचे काम हाती घेण्याच्या सूचना संबंधित विभागाला देण्यात याव्यात, अशी आग्रही मागणी नगरसेवक दीपक वेतकर यांनी आयुक्त सौरभ राव यांच्याकडे केली आहे.