महापालिकेच्या दारातच नालेसफाईचा बोजवारा; काँग्रेसने दिला गुलाबी इशारा !** *कागदोपत्री दाव्यांची मुंब्र्यात पोलखोल; अधिकाऱ्यांना गुलाब देत तातडीच्या कारवाईची मागणी


ठाणे : प्रतिनिधी

पावसाळ्यापूर्वी नालेसफाईची कामे पूर्ण झाल्याचे दावे करणाऱ्या महापालिका प्रशासनाची मुंब्र्यात पुन्हा एकदा पोलखोल झाली आहे. कागदोपत्री नालेसफाई पूर्ण झाल्याचे दाखवले जात असताना प्रत्यक्षात मुंब्रा प्रभाग समिती कार्यालयाजवळील नालाच साफ करण्यात आलेला नसल्याचे पाहणीत उघड झाल्याने प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

ठाणे काँग्रेसचे अध्यक्ष राहुल पिंगळे यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या प्रभागनिहाय नालेसफाई पाहणी मोहिमेदरम्यान हा प्रकार समोर आला. विशेष म्हणजे संबंधित अधिकाऱ्यांच्या निदर्शनास ही बाब आणून दिल्यानंतरही दुसऱ्या दिवशी परिस्थितीत कोणताही बदल दिसून आला नाही. त्यामुळे संतप्त झालेल्या काँग्रेसच्या शिष्टमंडळाने मुंब्रा प्रभाग समिती कार्यालय गाठत अधिकाऱ्यांना जाब विचारला.

यावेळी आंदोलनाचा आक्रमक मार्ग न स्वीकारता काँग्रेसने गांधीगिरीचा अवलंब केला. घनकचरा आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना गुलाबाची फुले देत नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आणि पावसाळ्यातील संभाव्य जलसंकट टाळण्यासाठी नालेसफाईची कामे तातडीने पूर्ण करण्याची विनंती करण्यात आली.

पावसाळा तोंडावर असताना महापालिकेच्या कार्यालयासमोरील नाल्याचीच सफाई झाली नसेल, तर शहरातील इतर भागांची स्थिती काय असेल, असा सवाल स्थानिक नागरिकांमधून उपस्थित होत आहे.
 प्रशासनाच्या दाव्यांमध्ये आणि प्रत्यक्ष कामांमध्ये असलेली तफावत यानिमित्ताने पुन्हा एकदा समोर आली आहे.

नागरिकांच्या समस्या सोडविण्याऐवजी केवळ कागदोपत्री अहवालांवर भर देणाऱ्या अधिकाऱ्यांनी आता तरी वास्तवात उतरून काम करावे, अशी मागणी करण्यात आली. अन्यथा नागरिकांच्या प्रश्नांसाठी आयुक्त दालनात ठिय्या आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही काँग्रेसने दिला आहे.यावेळी ब्लॉक अध्यक्ष निलेश पाटील,यासिन मोमीन,जेष्ठ नेते वसंत पोलाडीया,अल्पसंख्यक विभाग अध्यक्ष वसीम सय्यद,सेवादल अध्यक्ष रवींद्र कोळी,
प्रदेशओबीसी उपाध्यक्ष भोला पाटील,माजी महिला अध्यक्ष वैशाली भोसले,शहर उपाध्यक्ष गफूर रुमानी,अफसर खान,बिलाल तांबोळी,नियाज कुरणे,मुजावर सर,राजू ढवळे,गौरव कांबळे,राजेश मिश्रा,चंद्रकांत पाटील,शरद जाधव, आदी पदाधिकारी उपस्थित होते 

नालेसफाईचे दावे कागदावरच वाहत आहेत, तर नाल्यांमध्ये अजूनही गाळ तसाच आहे. आज गुलाब दिला आहे; उद्या नागरिकांच्या रोषाला सामोरे जाण्याची तयारी प्रशासनाने ठेवावी.

— राहुल पिंगळे (शहर जिल्हा काँग्रेस अध्यक्ष)




*
Shahar Varta News
Shahar Varta News