ठाणे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीतमहायुतीचे परिवर्तन पॅनल रिंगणातपॅनलप्रमुख कपिल पाटील यांची माहिती


ठाणे, दि. १० (प्रतिनिधी) : ठाणे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या (टीडीसीसी) निवडणुकीत महायुतीने परिवर्तन पॅनल रिंगणात उतरविले असून, महायुतीच्या सात उमेदवारांची यादी आज जाहीर करण्यात आली. परिवर्तन पॅनलचे प्रमुख व माजी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांनी आज पत्रकार परिषदेत उमेदवारांची घोषणा करून परिवर्तन पॅनलच्या विजयाचा निर्धार व्यक्त केला.

ठाणे जिल्हा बँकेची २७ जून रोजी निवडणूक होणार असून, २१ पैकी ९ उमेदवारांची बिनविरोध निवड झाली आहे. महायुतीतर्फे भाजपा ४ व शिवसेना ३ जागा लढवित आहे. भाजपतर्फे अनुसुचित जाती किंवा अनुसुचित जमातीतील मतदारसंघातून पांडुरंग बरोरा, खरेदी विक्री संघ प्रक्रिया संस्था व ग्राहक संस्था मतदारसंघात सिताराम राणे, महिला राखीव मतदारसंघात दिपाली पाटील, इतर मागासवर्ग मतदारसंघात हार्दिक राऊत, तर शिवसेनेतर्फे पगारदार सेवकांच्या सहकारी पतसंस्था, नागरी सहकारी संस्था व नागरी बँक मतदारसंघात प्रभू गोविंद पाटील, महिला मतदारसंघात सुवर्णा पावशे, विमुक्त जाती, भटक्या जमाती किंवा विशेष मागासवर्ग मतदारसंघात राजेंद्र घोलप यांना उमेदवारी देण्यात आली आहे. सहकार क्षेत्रात कार्य करणाऱ्या या उमेदवारांमुळे महायुतीला यश मिळेल, असा विश्वास कपिल पाटील यांनी व्यक्त केला. 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्याबरोबरच राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांबरोबर चर्चा करून परिवर्तन पॅनल तयार करण्यात आले आहे. या पॅनलला वरिष्ठ नेत्यांनी मंजुरी दिली आहे. या पॅनलचे प्रमुख म्हणून कपिल पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राज्यातील इतर भागांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातही महायुती असावी, या दृष्टीकोनातून परिवर्तन पॅनलची स्थापना करण्यात आली. या संदर्भात वन मंत्री गणेश नाईक, जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे यांच्याबरोबरही चर्चा झाली. यापूर्वी २०१३ मध्ये बँकेची उलाढाल ७ हजार कोटी रुपये होती. आता २०२६ मध्ये बँकेची उलाढाल १२ हजार ५०० कोटी रुपयांपर्यंत पोचली आहे, अशी माहिती पॅनलप्रमुख कपिल पाटील यांनी दिली.

परिवर्तन पॅनलच्या स्थापनेबाबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार श्रीकांत शिंदे, जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे यांच्याबरोबर चर्चा झाल्यानंतर उमेदवारांची घोषणा करण्यात आली, अशी माहिती शिवसेनेतर्फे बँकेचे माजी अध्यक्ष बाबाजी पाटील यांनी दिली. 
या पत्रकार परिषदेला भाजपाचे ठाणे शहर जिल्हाध्यक्ष संदिप लेले, माजी संचालक प्रशांत पाटील यांच्यासह महायुतीचे उमेदवार उपस्थित होते.
Shahar Varta News
Shahar Varta News