*महापारेषणच्या ‘मिशन वेस्ट टू वेल्थ’मधून गरजू विद्यार्थ्यांना मदतीचा हात*-------------*जागतिक पर्यावरण दिनी नवजीवन शाळेला दैनंदिनी, शालेय बॅग आणि रेनकोटसाठी आर्थिक मदत

---------
मुंबई, दि. ५ : पर्यावरण संरक्षण, पुनर्वापर आणि सामाजिक बांधिलकी यांचा सुंदर संगम घडवित महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी (महापारेषण) आणि वेसॅक इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक पर्यावरण दिनानिमित्त ठाण्यातील नवजीवन प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना विविध शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. महापारेषणच्या “मिशन वेस्ट टू वेल्थ” अभियानांतर्गत हा उपक्रम राबविण्यात आला.

अपर जिल्हाधिकारी तथा महापारेषणच्या कार्यकारी संचालक (मानव संसाधन) श्रीमती सुचिता भिकाने यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना दैनंदिनींचे वाटप करण्यात आले. यावेळी महापारेषणचे महाव्यवस्थापक (मानव संसाधन) श्री. राजू गायकवाड, सल्लागार श्री. विकास सोनार, वेसॅक इंडियाचे प्रमुख श्री. विजयकुमार कट्टी, नवजीवन प्राथमिक शाळेचे प्रमुख श्री. जितेंद्र बजाज, मुख्याध्यापिका श्रीमती शीला पाटील, श्रीमती अश्विनी तेरकर तसेच विद्यार्थी उपस्थित होते.

यावेळी श्रीमती सुचिता भिकाने यांनी शाळेतील विद्यार्थ्यांसाठी ३५० शालेय बॅग्ज आणि पावसाळी शूज देण्याची घोषणा केली. तसेच अपर जिल्हाधिकारी तथा कार्यकारी संचालक (मानव संसाधन) श्रीमती सुचिता भिकाने, महापारेषणचे महाव्यवस्थापक (मानव संसाधन) श्री. राजू गायकवाड आणि सल्लागार श्री. विकास सोनार यांनी विद्यार्थ्यांच्या रेनकोटसाठी आर्थिक मदत सुपूर्द केली.

दरम्यान, महापारेषणने पर्यावरण संरक्षणासाठी “प्लास्टिकमुक्ती अभियान” आणि “कपडे पुनर्वापर अभियान” हाती घेतले आहे. अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून जुने कपडे, शूज, चप्पल, वह्या, नोटबुक, जुने कागद, डायऱ्या, प्लास्टिक पिशव्या आणि इतर पुनर्वापर योग्य वस्तूंचे संकलन करण्यात येणार आहे. या वस्तूंचा पुनर्वापर करून गरजू घटकांना मदत करण्याबरोबरच पर्यावरण संवर्धनालाही हातभार लावण्याचा उद्देश आहे.

नवजीवन प्राथमिक शाळा ही शिक्षणापासून वंचित आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील मुलांसाठी कार्यरत असून, विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक, सामाजिक आणि सांस्कृतिक विकासासाठी विविध उपक्रम राबविते. महापारेषण आणि वेसॅक इंडियाच्या या उपक्रमामुळे अनेक विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलला असून, पर्यावरण संवर्धनासोबतच सामाजिक उत्तरदायित्वाचेही प्रभावी उदाहरण बनले आहे.
Shahar Varta News
Shahar Varta News