पालघर, ऑगस्ट ६: पालघर जिल्ह्यातील प्रसिद्ध पर्यटनस्थळ दाभोसा वॉटर फॉल येथील स्काय वॉक पुलाचे 15 ऑगस्ट 2026 रोजी उद्घाटन करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर मा. ना.श्री. गणेश नाईक, पालकमंत्री पालघर जिल्हा यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठकीचे आयोजन दि.०६ ऑगस्ट 2026 रोजी करण्यात आले होते. या बैठकीत स्काय वॉकच्या सुरक्षेचा आढावा घेण्यात आला असून अधिकृत उद्घाटनापूर्वी कोणालाही प्रवेश न देण्याचे कडक निर्देश मा. पालकमंत्री महोदय यांनी दिले आहेत.
*बैठकीतील महत्त्वाचे मुद्दे व निर्णयः
मा. पालकमंत्री महोदयांच्या बैठकीतील निर्देशः
* अपघातपूर्व सुरक्षा उपाययोजना (Preventive Safety Measures): कोणताही अपघात घडण्याची वाट न पाहता, अपघात टाळण्यासाठी आवश्यक असणाऱ्या सर्व सुरक्षात्मक उपाययोजनांची तात्काळ अंमलबजावणी करावी.
* पायाभूत सुविधा व क्राउड मॅनेजमेंटः पर्यटकांची सुरक्षितता व इतर सोयी सुविधा विचारात घेऊन वाहनतळ (पार्किंग), लेन मार्किंग, आणि गर्दीचे सुयोग्य व्यवस्थापन (Crowd Management) 15 ऑगस्टपूर्वी पूर्ण करावे.
* सर्व यंत्रणांचा समन्वयः सर्व संबंधित विभागांनी समन्वय ठेवून 15 ऑगस्ट रोजी स्काय वॉकचे उद्घाटन निर्विघ्नपणे पार पाडावे.
* वन विभागाने या पर्यटन स्थळावर सक्रिय सहभाग घेऊन इतर पायाभूत सुविधा पुरवाव्यात. यासाठी नियमित तपासणी व आवश्यकतेनुसार वनरक्षकांची नियुक्ती करावी.
*15 ऑगस्ट, २०२६ रोजी उद्घाटन*
पर्यटकांची सुरक्षितता व इतर तांत्रिक बाबी तपासून 15 ऑगस्ट 2026 रोजी स्काय वॉक पुलाच्या उद्घाटन कार्यक्रमाचे नियोजन करण्याचे आदेश सार्वजनिक बांधकाम विभागाला (जव्हार) देण्यात आले आहेत.
*पर्यटक क्षमता व वेळेचे व्यवस्थापन*
स्काय वॉकवर एकावेळी क्षमतेनुसार किती पर्यटकांना प्रवेश द्यावा, त्याचा कालावधी आणि प्रवेश शुल्क याबाबतचे योग्य नियोजन करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
*अनधिकृत प्रवेशास बंदी व कडक कारवाई*
उद्घाटनापूर्वी काही नागरिकांना स्काय वॉकवर प्रवेश दिल्याचे निदर्शनास आल्याने, जिल्हाधिकाऱ्यांनी यावर तीव्र नाराजी व्यक्त केली. अधिकृत उद्घाटनापर्यंत कोणालाही प्रवेश देऊ नये, अन्यथा नियमांचे उल्लंघन झाल्यास संबंधितांवर कडक कारवाई केली जाईल, असा इशारा त्यांनी दिला. यासंदर्भात अधीक्षक
अभियंत्यांनी संबंधितांवर जबाबदारी निश्चित करून योग्य ती कार्यवाही करण्याच्या स्पष्ट सचूना दिल्या.
सदर बैठकीस मा. पालकमंत्री, मा. खा. डॉ. हेमंत सवरा, पालघर लोकसभा सदस्य, मा. आ. श्री. हरिश्चंद्र भोये, विक्रमगड विधानसभा सदस्य, जिल्हाधिकारी डॉ. इंदू राणी जाखड, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे, पोलीस अधीक्षक यतीश देशमुख, उपवनसंरक्षक (जव्हार), प्रकल्प अधिकारी (आदिवासी विकास प्रकल्प), सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिक्षक अभियंता व कार्यकारी अभियंता आणि जिल्हा नियोजन अधिकारी आदी वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.