ठाणे (12) : ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील नागरिकांना दर्जेदार, सुलभ व प्रभावी आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र राज्याच्या मार्गदर्शनाखाली सार्वजनिक आरोग्य विभागातील वरिष्ठ आरोग्य अधिकाऱ्यांनी नुकतीच ठाणे महापालिकेच्या विविध नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रांना तसेच आयुष्मान आरोग्य मंदिरांना सदिच्छा भेट देऊन पाहणी केली.
या पाहणी दौऱ्यात ठाणे महापालिकेच्या नौपाडा, उथळसर, लोकमान्य कोपरी येथील नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रांसह गांधीनगर तलावपाळी, आदिवासी गार्डन, दादामिल नाका येथील नागरी आयुष्मान आरोग्य मंदिर तसेच ‘हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे – आपला दवाखाना, पांचपाखाडी’ या आरोग्य केंद्राची पाहणी करण्यात आली.
पाहणीदरम्यान ओपीडी सेवा, आरोग्य केंद्रांची बाह्य व अंतर्गत स्वच्छता, NQAS मानांकन, औषधसाठा, बायो-मेडिकल वेस्ट व्यवस्थापन, NCD व RCH नोंदवही, HMIS पोर्टलवरील नोंदी, ई-औषधी प्रणाली आदी बाबींची तपासणी करण्यात आली. यावेळी आरोग्य केंद्रांमध्ये नागरिकांना अधिक चांगल्या आरोग्य सुविधा उपलब्ध करून देणे, आरोग्य सेवांची गुणवत्ता वाढविणे तसेच केंद्रांमधील व्यवस्थापन अधिक सक्षम करण्याबाबत संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना देण्यात आल्या.
पाहणीदरम्यान निदर्शनास आलेल्या बाबींवर तात्काळ कार्यवाही करण्याचे निर्देश संबंधित वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांना देण्यात आले. ठाणे महानगरपालिका आरोग्य विभागामार्फत सर्व आरोग्य केंद्रांमध्ये दर्जेदार, पारदर्शक व नागरिकाभिमुख आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यासाठी आवश्यक सुधारणा व उपाययोजना करण्यात येत असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
या भेटीदरम्यान आरोग्यमंत्री यांचे ओ.एस.डी डॉ. अमोल भोर, उपसंचालक डॉ. प्रसाद भंडारी, (DD-Urban), ADHS सहायक संचालक डॉ. सुहास मांडे, राज्य कार्यक्रम व्यवस्थापक (SPM), NUHM डॉ. अमोल बागा, ठाणे महापालिकेचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. प्रसाद पाटील, माता व बालसंगोपन अधिकारी डॉ. वर्षा ससाणे उपस्थित होते.