ठाणे महानगर पालिकेने प्रस्तावित मालमत्ता करवाढ आणि मालमत्ता हस्तांतरण शुल्कवाढ मागे घ्यावी - नरेश मणेरा.

  

          ठाणे महानगरपालिका प्रशासनातर्फे येत्या मा.महासभेत निवासी मालमत्ता करात १२% तर बिगरनिवासी मालमत्ता करात २०% करवाढीचा प्रस्ताव ठेवण्यात आलेला आहे. तसेच आतापर्यंत क्षेत्रफळानुसार आकारण्यात येणारे मालमत्ता हस्तांतरण शुल्क पिंपरी-चिंचवड महापालिकेप्रमाणे प्रचलित बाजारमूल्याच्या ०.५% इतके आकारण्याचे प्रस्तावित आहे.

          महापालिका प्रशासनाची ही प्रस्तावित मालमत्ता करवाढ आणि मालमत्ता हस्तांतरण शुल्कवाढ ही ठाणेकरांवरील आर्थिक बोजा वाढवणारी आणि अन्याय्य असल्याने सर्व ठाणेकर करदात्यांचा त्याला कडाडून विरोध राहील. महापालिकेच्या सन २०२६-२७ च्या अर्थसंकल्पात कोणतीही करवाढ, दरवाढ वा शुल्कवाढ नसल्याचा डांगोरा पिटला गेला मग आता आर्थिक वर्षाच्या मध्यावर अशी करवाढ व शुल्कवाढ ठाणेकरांच्या माथी का मारली जात आहे ? असा सवाल माजी उप महापौर नरेश मणेरा यांनी एका पत्राद्वारे केला आहे.

          प्रस्तावित निवासी व बिगरनिवासी मालमत्ता करातील अनुक्रमे १२% आणि २०% करवाढीमुळे सुमारे ५०० चौ. फुटापर्यंतच्या सुमारे ५०००/- रुपये करयोग्य मूल्य असलेल्या निवासी मालमत्ता करातील विशेष साफसफाई कर, वृक्षकर, रस्ताकर, अग्निशमनकर आणि शिक्षणकर या करांमध्ये एकूण रु.६००/- अधिक भुर्दंड तर बिगरनिवासी मालमत्तांना एकूण ११००/- रुपये इतका अधिक भुर्दंड ठाणेकर मालमत्ताधारकांवर पडणार आहे.

          तर प्रस्तावित मालमत्ता हस्तांतरण शुल्कवाढीचा निर्णय हा ठाणेकरांचे कंबरडे मोडणारा ठरणार आहे. कारण आतापर्यंत मालमत्तेच्या क्षेत्रफळाप्रमाणे आकारले जाणारे हस्तांतरण शुल्क हे पिंपरी-चिंचवड महापालिकेप्रमाणे बाजारभावाच्या ०.५% इतके आकारले जाणार आहे. त्यामुळे ५०० चौ. फुटापर्यंत आतापर्यंत रु.१०००/- इतके असणारे मालमत्ता हस्तांतरण शुल्क सद्याचे बाजारभाव पाहतां अंदाजे एक कोटी रुपयांवर ०.५% प्रमाणे सुमारे ५००००/- रुपये इतके म्हणजे ५० पटीने प्रचंड वाढणार आहे. शिवाय वारसाहक्काने हस्तांतरीत होणाऱ्या सद्याच्या शुल्कवाढीत आणि झोपड्यांच्या हस्तांतरण शुल्कातही तिप्पटीने वाढ करण्याचे प्रस्तावित असून हे अत्यंत अयोग्य आहे.

          या प्रस्तावित करवाढीमुळे महापालिकेचे उत्पन्न सुमारे १०५ कोटीने वाढेल असे सांगितले जाते. मात्र मालमत्ता कराची वर्षनुवर्षांची थकबाकी, ९०% ते ९५% पर्यंत करवसुली उद्दिष्ट, मालमत्ता वापरात बदल व वाढीव बांधकाम, नवीन मालमत्ता करआकारणी यासारख्या बाबींकडेही पुरेशा गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे आहे. तसेच उत्पन्नवाढीबरोबरच खर्चाच्या बाबींकडेही लक्ष देऊन विविध विकास कामे व इतर कामांवरील अवाजवी खर्च टाळून काटकसर करणे, कामांचे योग्य ते नियोजन व प्राधान्यक्रम, आर्थिक शिस्त याबाबतही दक्षता व खबरदारी आवश्यक आहे.

          परिवहन सेवेची प्रस्तावित तिकीट दरवाढ शिवाय इतर करवाढ व दरवाढ, महागाई यामुळे सर्वसामान्य ठाणेकर आधीच त्रस्त आहे. त्यात नियोजनशून्य विकासकामांमुळे शहरात होणाऱ्या सततच्या वाहतूककोंडीने व रस्त्यावरील दरवर्षीच्या खड्ड्यांमुळे नागरिकांत संताप आहे. म्हणूनच प्रस्तावित मालमत्ता करवाढ व मालमत्ता हस्तांतरण शुल्कवाढ हि सद्यस्थितीत अयोग्य, अनुचित व अन्याय्य आहे.

          तरी महापालिका प्रशासनाने प्रस्तावित मालमत्ता करवाढ आणि मालमत्ता हस्तांतरण शुल्कवाढ मागे घेण्यांत यावी अशी मागणी नरेश मणेरा यांनी आयुक्त व महापौर यांना केली आहे.
Shahar Varta News
Shahar Varta News