शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या अर्जित रजा रोखीकरणाला मंजुरी; आमदार निरंजन डावखरे यांच्या पाठपुराव्याला यश


मुंबई : राज्यातील अकृषी विद्यापीठे, शासन अनुदानित महाविद्यालये आणि उच्च व तंत्र शिक्षण विभागांतर्गत कार्यरत शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या अर्जित रजा रोखीकरणाच्या मागणीला अखेर न्याय मिळाला आहे. सुधारित सातव्या वेतन आयोगानुसार अर्जित रजेच्या रोखीकरणासाठी शासनाने अधिकृत शासन निर्णय (जीआर) जारी केला असून, याचा लाभ राज्यातील हजारो शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना होणार आहे. या निर्णयासाठी कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार ॲड. निरंजन डावखरे यांनी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश आल्याचे मानले जात आहे.

या विषयावर नुकतीच उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत (दादा) पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात बैठक झाली होती. या बैठकीत महाराष्ट्र राज्य महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचारी महासंघ आणि अशासकीय महाविद्यालय शिक्षकेतर कर्मचारी महासंघ (कल्याण) यांनी शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्या मांडल्या. त्यामध्ये सातव्या वेतन आयोगानुसार अर्जित रजेच्या रोखीकरणाची मागणी प्राधान्याने करण्यात आली होती.

बैठकीनंतर आमदार डावखरे यांनी संबंधित विभागांशी सातत्याने समन्वय साधत हा विषय तातडीने मार्गी लावण्यासाठी पाठपुरावा केला. महासंघाचे अध्यक्ष राजा बढे, सरचिटणीस सुजित आर. बी. सिंह तसेच उच्च शिक्षण संचालक डॉ. शैलेंद्र देवळाणकर यांनीही प्रशासकीय स्तरावर आवश्यक कार्यवाहीला गती दिल्याने शासन निर्णय निर्गमित होण्याचा मार्ग मोकळा झाला.

शासन निर्णयानुसार, १ जानेवारी २०१६ पासून लागू झालेल्या सातव्या वेतन आयोगाच्या सुधारित वेतन संरचनेनुसार अर्जित रजेच्या रोखीकरणाची परिगणना करण्यास मान्यता देण्यात आली आहे. यापूर्वी वित्त विभागाने राज्य शासकीय कर्मचाऱ्यांसाठी २४ मे २०१९ रोजी असा निर्णय लागू केला होता. त्याच धर्तीवर आता उच्च व तंत्र शिक्षण विभागातील पात्र शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनाही हा लाभ मिळणार आहे.

या निर्णयाचा लाभ सार्वजनिक विद्यापीठे, शासन अनुदानित अभिमत विद्यापीठे, उच्च शिक्षण संचालनालय, तंत्र शिक्षण संचालनालय, कला संचालनालय यांच्या नियंत्रणाखालील अनुदानित महाविद्यालये तसेच सामाजिक न्याय विभागाकडून हस्तांतरित समाजकार्य महाविद्यालयांमधील दीर्घ सुट्टी अनुज्ञेय नसलेल्या शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना होणार आहे. संबंधित संवर्गाची पात्रता विभागीय स्तरावर तपासून त्यानुसार कार्यवाही करण्याचे निर्देशही शासनाने दिले आहेत.

याबाबत प्रतिक्रिया देताना आमदार ॲड. निरंजन डावखरे म्हणाले, “शिक्षकेतर कर्मचारी हे उच्च शिक्षण व्यवस्थेचा कणा आहेत. अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेली ही न्याय्य मागणी पूर्ण झाल्याने हजारो कर्मचाऱ्यांना आर्थिक दिलासा मिळणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी या विषयाकडे सकारात्मक दृष्टीने पाहून निर्णय घेतला. ही केवळ आर्थिक सवलत नसून शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या सेवेला दिलेला सन्मान आहे. त्यांच्या इतर प्रलंबित मागण्यांसाठीही माझा पाठपुरावा कायम राहील.”

दरम्यान, शासन निर्णयाबद्दल महाराष्ट्र राज्य महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचारी महासंघ आणि अशासकीय महाविद्यालय शिक्षकेतर कर्मचारी महासंघ (कल्याण) यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील, वित्त राज्यमंत्री आशिष जयस्वाल, आमदार ॲड. निरंजन डावखरे, उच्च शिक्षण संचालक डॉ. शैलेंद्र देवळाणकर आणि विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांचे आभार मानले. तसेच सुधारित आश्वासित प्रगती योजना (१०, २०, ३०) लागू करणे आणि रिक्त शिक्षकेतर पदांची भरती यांसारख्या उर्वरित मागण्यांसाठीही शासनाकडे पाठपुरावा सुरू ठेवण्याचा निर्धार महासंघाने व्यक्त केला.
Shahar Varta News
Shahar Varta News