ठाणे, (07) : ठाणे महानगरपालिका शिक्षण विभाग आणि बिसलेरी इंटरनॅशनल यांच्या संयुक्त विद्यमाने शालेय विद्यार्थ्यांमध्ये प्लास्टिक कचरा व्यवस्थापन, पुनर्वापर आणि पर्यावरण संवर्धनाची जाणीव निर्माण करण्यासाठी 'बॉटल्स फॉर चेंज' या अभिनव उपक्रमाचा शुभारंभ आज महापौर शर्मिला पिंपळोलकर यांच्या हस्ते करण्यात आला. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणाविषयी जबाबदारीची भावना निर्माण होण्यासाठी व पर्यावरण संवर्धनाची चळवळ अधिक बळकट होण्यासाठी मदत होणार आहे. विद्यार्थ्यांमध्ये कचरा वर्गीकरणाची सवय, प्लास्टिक संकलन आणि पुनर्प्रक्रियेबाबत जागरूकता निर्माण करण्याच्या दृष्टीने हा उपक्रम महत्त्वाचा ठरणार असल्याचे महापौरांनी नमूद केले.
ठाणे महानगरपालिकेच्या कै. नरेंद्र बल्लाळ सभागृहात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमास सभागृह नेते हणमंत जगदाळे, अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे, उपायुक्त डॉ. मिताली संचेती, शिक्षणाधिकारी शेषराव बढे, गटअधिकारी संगीता बामणे बिसलेरी इंटरनॅशनलचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अँजेलो जॉर्ज, बिसलेरीचे प्रतिनिधी राहूल पाटील यांच्यासह ठाणे महानगरपालिकेच्या शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक व विद्यार्थी मोठया संख्येने उपस्थित होते.
प्लास्टिकच्या बाटल्या, चॉकलेट व वेफर्सची कव्हर्स, प्लास्टिक पिशव्या, मोबाईल कव्हर्स, शॅम्पूच्या बाटल्या, प्लास्टिक खेळणी आदी विविध प्रकारचा प्लास्टिक कचरा वेगळा गोळा करून पुनर्प्रक्रियेसाठी देण्याची सवय विद्यार्थ्यांना लागणे ही काळाची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले. प्रत्येक नागरिकाने आपल्या घराबरोबरच परिसर स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी स्वीकारल्यास ठाणे शहर अधिक स्वच्छ आणि सुंदर बनेल, असा विश्वासही महापौर शर्मिला पिंपळोलकर यांनी व्यक्त केला.
अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे यांनी सांगितले की, शहरात दररोज मोठ्या प्रमाणावर कचरा निर्माण होतो. महानगरपालिकेची जबाबदारी केवळ कचरा संकलन व प्रक्रिया करण्यापुरती मर्यादित नसून कचरा निर्माण होणारच नाही किंवा तो कमीत कमी निर्माण होईल यासाठी समाजात जागृती होणे आवश्यक आहे. प्लास्टिकचे विघटन होण्यासाठी अनेक वर्षे लागतात. त्यामुळे जलप्रदूषण आणि भूमीप्रदूषणाची समस्या अधिक गंभीर बनत आहे. पर्यावरण संरक्षणाची सुरुवात विद्यार्थ्यांपासून व्हावी या उद्देशाने शाळांमध्ये हा उपक्रम राबविण्यात येत असल्याचे अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे यांनी नमूद केले.
प्रत्येक सहभागी शाळेला विशेष पासबुक देण्यात आले असून त्यामध्ये विद्यार्थ्यांनी जमा केलेल्या प्लास्टिक कचऱ्याची नोंद केली जाणार आहे. प्रत्येक शाळेत मोबाईल अॅपच्या माध्यमातून प्लास्टिक संकलनाची डिजिटल नोंद होईल. कोणत्या शाळेतून किती प्लास्टिक पुनर्प्रक्रियेसाठी पाठविण्यात आले याचे अचूक मॉनिटरिंग करता येणार आहे. या उपक्रमात सातत्याने सहभाग घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे नियतकालिक मूल्यमापन करून त्यांचा गौरव करण्यात येणार आहे. केवळ पर्यावरणाविषयी शिकविण्यापेक्षा विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष कृतीतून पर्यावरण संवर्धन करावे, हा या उपक्रमाचा उद्देश असल्याचे उपायुक्त डॉ. मिताली संचेती यांनी प्रास्ताविकपर भाषणात स्पष्ट केले.
"भारतासमोरील सर्वात गंभीर पर्यावरणीय समस्यांपैकी प्लास्टिक कचरा व्यवस्थापन ही एक महत्त्वाची समस्या आहे. पर्यावरणपूरक सवयी बालपणापासूनच रुजल्या पाहिजेत, असा आमचा विश्वास आहे. 2019 पासून ठाण्यात आम्ही शाळा, गृहनिर्माण संस्था आणि नागरिकांसोबत काम करत आहोत. ठाणे महानगरपालिकेच्या सहकार्याने विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण संवर्धनाची जाणीव अधिक दृढ होईल."असे बिसलेरी इंटरनॅशनलचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अँजेलो जॉर्ज यांनी नमूद केले.
यावेळी ठाणे महापालिका शाळांतील विद्यार्थ्यांनी स्वचछतेचा संदेश देणारे नृत्य सादर केले. तसेच विद्यार्थ्यांमध्ये या उपक्रमाची जनजागृती करण्यासाठी शिक्षकांची कार्यशाळा घेण्यात आली.