ठाण्याच्या आरोग्यसेवेला नवा चेहरा; डॉ. कैलास पवारांकडे उपसंचालकपदाची जबाबदारीशासकीय रुग्णालयांच्या कायापालटाला वेग; सुपर स्पेशालिटी रुग्णालय लवकरच सेवेत, ग्रामीण आरोग्य यंत्रणेतही बदलाचे प्रयत्न


आरोग्यसेवा ही केवळ इमारतींची नव्हे, तर माणसांच्या आयुष्याशी जोडलेली व्यवस्था आहे. ठाणे जिल्ह्यातील शासकीय आरोग्यसेवेत सकारात्मक बदल घडविण्यासाठी सातत्याने प्रयत्न करणारे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. कैलास पवार यांच्याकडे आता उपसंचालक, आरोग्य सेवा, मुंबई मंडळ, ठाणे या पदाचा अतिरिक्त कार्यभार सोपविण्यात आला आहे. पदभार स्वीकारल्यानंतर मुंबई, ठाणे पालघर रायगड आरोग्य यंत्रणेत सुरू असलेल्या विविध कामांना आणखी गती मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.

ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या माध्यमातून सर्वसामान्य रुग्णांना अधिक चांगल्या आरोग्य सुविधा मिळाव्यात, यासाठी डॉ. पवार यांच्या नेतृत्वाखाली विविध पातळ्यांवर प्रयत्न करण्यात आले. जुन्या सिव्हिल रुग्णालयाच्या जागी आकार घेत असलेले सुपर स्पेशालिटी रुग्णालय हे या प्रयत्नांमधील महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे. अत्याधुनिक आरोग्य सुविधांनी सज्ज होणारे हे रुग्णालय येत्या काही महिन्यांत सर्वसामान्यांच्या सेवेत उपलब्ध होण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे.

या प्रकल्पाला गती देण्यासाठी डॉ. पवार यांनी प्रशासन, वैद्यकीय यंत्रणा आणि संबंधित विभागांशी सातत्याने समन्वय साधत मोठी मेहनत घेतली. त्यामुळे ठाणेकरांच्या आरोग्यसेवेला आधुनिक सुविधांची नवी दारे खुली होण्याची आशा निर्माण झाली आहे.

केवळ शहरातील मोठ्या रुग्णालयांपुरते मर्यादित न राहता उपजिल्हा रुग्णालये, ग्रामीण रुग्णालये आणि कुटीर रुग्णालयांच्या सुविधांमध्येही सुधारणा करण्याचा प्रयत्न सुरू आहे. ग्रामीण आणि दुर्गम भागातील नागरिकांना उपचारासाठी शहराकडे धाव घ्यावी लागू नये, स्थानिक पातळीवरच दर्जेदार आरोग्य सुविधा उपलब्ध व्हाव्यात, हा या प्रयत्नांचा केंद्रबिंदू आहे.

ठाणे जिल्ह्याच्या आरोग्य यंत्रणेला अधिक सक्षम, आधुनिक आणि सर्वसामान्यांच्या जवळ नेण्याच्या या प्रयत्नांमध्ये डॉ. कैलास पवार यांची भूमिका महत्त्वाची ठरत आहे. आता उपसंचालकपदाची अतिरिक्त जबाबदारी मिळाल्याने जिल्ह्यातील आरोग्यसेवेच्या कायापालटाच्या कामाला आणखी व्यापक दिशा मिळण्याची अपेक्षा आहे.

सर्वसामान्यांना दर्जेदार आणि वेळेवर आरोग्यसेवा मिळणे हेच आमचे प्रमुख उद्दिष्ट आहे. नवीन जबाबदारीच्या माध्यमातून शासकीय आरोग्य यंत्रणा अधिक सक्षम करण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करू.

 डॉ. कैलास पवार (उप संचालक आरोग्य सेवा मुंबई मंडळ ठाणे)
Shahar Varta News
Shahar Varta News