ठाणे : दिवा परिसरातील अनधिकृत शाळांचा गंभीर प्रश्न गेल्या अनेक वर्षांपासून कायम असताना आणि या शाळांवर कारवाई करण्याची मागणी वारंवार होत असताना, अनधिकृत शाळांच्या प्रश्नाशी संबंधित असल्याचा आरोप असलेल्या व्यक्तीचा ‘ठाणे गौरव’ पुरस्काराने सन्मान करण्यात आल्याने ठाणे महानगरपालिका प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. याप्रकरणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे कल्याण ग्रामीण विधानसभा उपजिल्हाप्रमुख ॲड. रोहिदास बामा मुंडे यांनी प्रशासनावर जोरदार टीका केली आहे.
दिवा परिसरातील अनधिकृत शाळांचा प्रश्न नवीन नसून, ठाणे महानगरपालिकेच्या शिक्षण विभागाने २०२५ मध्ये जाहीर केलेल्या ८१ अनधिकृत शाळांच्या यादीमध्ये तब्बल ६१ शाळा दिवा परिसरातील असल्याचे समोर आले होते. त्यानंतर २०२६ मध्ये जाहीर झालेल्या ५८ अनधिकृत शाळांच्या यादीतही दिव्यातील ३८ शाळांचा समावेश असल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले आहे.
याशिवाय, २०२५ मध्ये महापालिकेकडून अनधिकृत शाळांवर मोठ्या प्रमाणात दंड आकारण्यात आल्याचे समोर आले होते. मात्र, आकारण्यात आलेल्या दंडाच्या तुलनेत प्रत्यक्ष वसुली अत्यल्प असल्याचेही वृत्त प्रसिद्ध झाले होते.
या पार्श्वभूमीवर ॲड. रोहिदास मुंडे यांनी सवाल उपस्थित केला आहे की, “दिव्यातील अनधिकृत शाळांचा प्रश्न महापालिका प्रशासनाला माहिती आहे. या शाळांवर नोटिसा, दंड आणि काही प्रकरणांमध्ये गुन्हे दाखल करण्यात आल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. तरीही या शाळांचा प्रश्न पूर्णपणे निकाली का निघत नाही? पालकांच्या आणि विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी संबंधित असलेल्या या गंभीर विषयावर ठोस कारवाई का होत नाही?”
“एकीकडे दिव्यातील अनधिकृत शाळांवर कारवाई करण्याची मागणी नागरिक, सामाजिक संस्था आणि विविध संघटनांकडून सातत्याने केली जात आहे. दुसरीकडे, याच पार्श्वभूमीवर विनोद पाटील यांचा ‘ठाणे गौरव’ पुरस्काराने सन्मान होत असेल, तर या पुरस्काराची निवड कोणत्या निकषांवर झाली, याचे स्पष्टीकरण महापालिका प्रशासनाने ठाणेकरांना द्यावे,” अशी मागणी मुंडे यांनी केली.
तसेच रमाकांत मढवी यांच्यासह संबंधित पदाधिकाऱ्यांची अनधिकृत शाळांच्या संदर्भातील भूमिका काय होती, कोणत्या शाळांच्या संदर्भात प्रशासनाकडे पाठपुरावा करण्यात आला आणि या संपूर्ण प्रकरणात कोणत्याही प्रकारचा प्रशासकीय दबाव किंवा हस्तक्षेप झाला आहे का, याची चौकशी झाली पाहिजे, असेही ॲड. मुंडे यांनी म्हटले आहे.
“हा प्रश्न कोणत्याही एका व्यक्तीपुरता मर्यादित नाही. दिव्यातील हजारो विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा हा प्रश्न आहे. अनधिकृत शाळा सुरू राहणे, त्यांच्यावर दंड होऊनही वसुलीचा प्रश्न निर्माण होणे आणि त्याचवेळी संबंधित क्षेत्रातील व्यक्तींचा सन्मान होणे, या सर्व बाबींची प्रशासनाने गांभीर्याने दखल घेतली पाहिजे,” असे ॲड. मुंडे म्हणाले.
“महापालिका प्रशासन आणि शिक्षण विभागाने दिव्यातील सर्व अनधिकृत शाळांची अद्ययावत यादी, त्यांच्यावर केलेली कारवाई, आकारलेला दंड, प्रत्यक्ष वसूल झालेली रक्कम आणि दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यांची सद्यस्थिती सार्वजनिक करावी. तसेच ‘ठाणे गौरव’ पुरस्कारासाठी संबंधित व्यक्तीची निवड कोणत्या प्रक्रियेतून झाली, याची माहितीही जनतेसमोर ठेवावी,” अशी मागणी त्यांनी केली.
“विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी तडजोड करून कोणालाही संरक्षण देण्याचा प्रयत्न झाला, तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या माध्यमातून त्याला तीव्र विरोध केला जाईल,” असा इशाराही ॲड. रोहिदास बामा मुंडे यांनी दिला.