ठाणे - येत्या 26 नोव्हेंबर रोजी दुपारी चार वाजता ठाणे स्टेशन ते कोर्टनाका, संविधान चौक अशी संविधान गौरव रॅली काढण्यात येणार आहे, अशी माहिती शिव, फुले, शाहू , आंबेडकर संविधान गौरव समितीचे मुख्य संयोजक नानासाहेब इंदिसे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
ठाणे स्टेशन येथील डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून या रॅलीला सुरूवात होणार आहे. ही रॅली संविधान चौकात प्रस्ताविकेच्या सामूहिक वाचनाने विसर्जित होणार आहे. या रॅलीत संविधानाची प्रतिकृती ठेवण्यात येणार आहे. ठाणे शहरातील शिव-शाहू-फुले-आंबेडकरी जनतेच्या वतीने या रॅलीचे आयोजन केले आहे. भारतीय संविधान हे लोकशाहीला अभिप्रेत आहे. ही लोकशाही अबाधित ठेवण्यासाठी ही रॅली काढण्यात येणार असून शिव-शाहू-फुले-आंबेडकरी विचारधारा मानणाऱ्या समाजाच्या लोकांनी याच्यासाठी चार वाजता ठाणे स्टेशन या ठिकाणी जमावे, असे आवाहन नानासाहेब इंदिसे यांनी केले.
रॅलीचा उद्देश संविधानाप्रती जी जनजागृती व्हायला हवी आहे, ती करणं. दुसरी महत्त्वाची गोष्ट—गेल्या काही दिवसात ज्या पद्धतीच्या काही चर्चा आहेत, त्या चर्चांना फाटा देऊन संविधान हे आपलं रक्षण करतंय, ना की संविधानाच्या रक्षणासाठी कोणाला रस्त्यावर उतरावं लागतंय. संविधान आपलं रक्षण करतंय, हा संदेश तमाम नागरिकांमध्ये पोहोचवणं हाच या रॅलीमागचा उद्देश आहे. या रॅलीत संविधानप्रेमी नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थितरहावे, असे यावेळी भास्कर वाघमारे, राजाभाऊ चव्हाण, जे. जी. यादव, संजय भालेराव, प्रफुल वाघोले, प्रल्हाद मगरे, प्रमोद इंगळे यांनी केले.