ठाणे : वंचित बहुजन आघाडीतर्फे आगामी २५ नोव्हेंबरला राज्यव्यापी संविधान सन्मान महासभा आयोजित करण्यात आली असल्याचे पक्षाचे महाराष्ट्र राज्य प्रदेशाध्यक्ष राजेंद्र पातोडे यांनी सांगितले. ही महासभा छत्रपती शिवाजी पार्कमध्ये होणार असल्याचे पातोडे यांनी यावेळी जाहीर केले.
या महासभेच्या पार्श्वभूमीवर प्रचार आणि संघटनात्मक आढावा घेण्यासाठी ठाणे जिल्हा आणि शहर , कल्याण, डोंबिवली, भिवंडी, उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर, मुरबाड, शहापूर, टिटवाळा, कसारा, यांच्यासह नवीमुंबई, वाशी, नेरुळ, सी वूड्स, बेलापूर, खारघर, सानपाडा,कोपरखैरणे, ऐरोली, पालघर जिल्ह्यातील जिल्हा आणि तालुका पदाधिकाऱ्यांचा मेळावा ठाण्यात आयोजित करण्यात आला होता. यावेळी पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना राजेंद्र पातोडे म्हणाले, विदर्भ आणि मराठवाडा याठिकाणी निर्माण झालेल्या दुष्काळजन्य परिस्थितीमुळे संविधान सन्मान महासभा यशस्वी करण्याची जबाबदारी मुंबई, ठाणे,पालघर,रायगड आणि पुणे जिल्ह्यातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांवर आहे. त्यासाठी स्थानिक पातळीवर चौक सभा घेणे, समाज माध्यमांवर संदेश पाठवून यासंदर्भात जनजागृती करण्याचे आवाहन यावेळी राजेंद्र पातोडे यांनी कार्यकर्त्यांना केले. पक्षात सक्रिय असलेल्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा विचार निवडणुकीची तिकिटं आणि पदं देताना केला जाणार असल्याचा इशारा त्यांनी यावेळी दिला.
या आढावा बैठकीसाठी पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश महासचिव प्रा. सोमनाथ साळुंखे,ठाणे जिल्हा निरीक्षक अरुण जाधव,पालघर जिल्हा निरीक्षक उत्तम वनशिव, नांदेड जिल्हा निरीक्षक सारंग थोरात, बुलढाणा,जालना जिल्हा निरीक्षक नागोराव पांचाळ, धुळे नंदुरबार जिल्हा निरीक्षक दीपक डोके आदी राज्य पदाधिकाऱ्यांसह पक्षाचे स्थानिक पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.