ठाणे/ पालघर, दि. २३ नोव्हेंबर २०२६:
वनहक्क दाव्यांचा प्रश्न केवळ कागदावर न राहता वंचित आणि उपेक्षित घटकांना प्रत्यक्ष वन जमिनीचा हक्क मिळावा, यासाठी श्रमजीवी संघटना आणि शासन प्रशासन संयुक्तपणे मैदानात उतरले आहे. २७ ऑक्टोबर २०२६ रोजी श्रमजीवी संघटनेने काढलेल्या 'संविधान हक्क संघर्ष मोर्चा'च्या पार्श्वभूमीवर शासनाने १५ डिसेंबर २०२६ पूर्वी सर्व प्रलंबित वनहक्क दाव्यांचा निपटारा करण्याचा महत्त्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित केला आहे. या निर्णयाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी ठाणे आणि पालघर जिल्ह्यांतील विविध तालुक्यांच्या उपविभागीय कार्यालयांत विशेष छाननी शिबिरांचे आयोजन करण्यात आले असून, आदिवासी विकास आढावा समिती अध्यक्ष (मंत्री दर्जा) तथा श्रमजीवी संघटनेचे संस्थापक विवेक पंडित यांनी वनदावेदार आणि अधिकाऱ्यांसोबत संवाद साधत भिवंडी, ठाणे प्रांत कार्यालय येथे तर श्रमजीवी संघटनेच्या अध्यक्ष सिता घाटाळ यांनी जव्हार आणि वसई येथे सुरु असलेल्या वनहक्क दावे छाननी शिबीर या संपूर्ण प्रक्रियेचा सविस्तर आढावा घेतला.
श्रमजीवी संघटनेने दिलेल्या निवेदनानुसार, सर्व उपविभागातील प्रलंबित व नामंजूर वनहक्क दावे वेळेत निकाली काढण्यासाठी तसेच दाव्यांमधील त्रुटींची पूर्तता करून पात्र दावेदारांना न्याय मिळवून देण्यासाठी १८ ते २८ नोव्हेंबर २०२६ या कालावधीत विशेष छाननी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. शासनाने निश्चित केलेल्या १५ डिसेंबरच्या मुदतीपूर्वी दाव्यांचा पूर्ण निपटारा करण्यासाठी प्रशासनाने मंडळनिहाय पथके गठीत केली आहेत.
या छाननी प्रक्रियेला गती देण्यासाठी संबंधित गावातील वनहक्क समितीचे पदाधिकारी, ग्रामसेवक, वनपरिक्षेत्र अधिकारी (R.F.O.), गटविकास अधिकारी (B.D.O.) आणि तहसीलदार यांना एकत्रित निमंत्रित करण्यात आले आहे. नेमून दिलेल्या तारखेला कार्यालयीन वेळेत उपस्थित राहून मंडळनिहाय दाव्यांची तपासणी करण्याचे आदेश प्रशासनाकडून देण्यात आले आहेत.
प्रलंबित वनपट्टे, वाढीव क्षेत्राची मागणी आणि नामंजूर दाव्यांचे पुनर्विलोकन या मुद्द्यांवर सध्या युद्धपातळीवर काम सुरू आहे. ठाणे आणि पालघर या दोन्ही जिल्ह्यांतील कार्यालयांत सुरू असलेल्या या छाननी प्रक्रियेसाठी श्रमजीवी संघटनेचे कार्यकर्ते आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांसह स्वतः वनदावेदार व त्यांचे वारस, विशेषतः तरुण-तरुणी मोठ्या संख्येने उपस्थित राहून आपल्या हक्काच्या दाव्यांची पूर्तता करत आहेत. या मोहिमेमुळे वर्षानुवर्षे रखडलेल्या वनहक्कांच्या प्रश्नाला आता निर्णायक वळण मिळाले आहे.