ठाणे : प्रतिनिधी
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) पक्षाच्या राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या ठाणे शहर (जिल्हा) अध्यक्षपदी नित्यानंद (वीरू) वाघमारे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांच्या उपस्थितीत ही नियुक्ती करण्यात आली. राष्ट्रीय मुख्य प्रवक्ते तथा आमदार डॉ. जितेंद्र आव्हाड यांच्या नेतृत्वाखाली आणि ठाणे जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान यांच्या मार्गदर्शनाखाली ही नियुक्ती जाहीर करण्यात आली.
युवक संघटना अधिक सक्षम करण्यासोबतच पक्षाचे विचार आणि ध्येयधोरणे तरुणांपर्यंत पोहोचविणे, युवकांचे प्रश्न मांडणे आणि पक्ष संघटनेचा विस्तार करणे, अशी महत्त्वपूर्ण जबाबदारी नवनियुक्त अध्यक्ष नित्यानंद (वीरू) वाघमारे यांच्यावर सोपविण्यात आली आहे.
या नियुक्तीप्रसंगी ठाणे गटनेते तथा नगरसेवक अभिजित पवार, नगरसेवक यासिन कुरैशी यांच्यासह पक्षाचे शेकडो पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी उपस्थित मान्यवरांनी नवनियुक्त अध्यक्षांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
या नियुक्तीमुळे ठाणे शहरातील राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या संघटनात्मक बांधणीला नवी दिशा मिळणार असून युवकांना पक्षाशी जोडण्यासाठी नित्यानंद वाघमारे कशा पद्धतीने पुढाकार घेतात, याकडे आता राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.