हिरानंदानी इस्टेटमधील दुर्गंधी दूर होणार,साठविलेला कचरा हटविण्यास सुरुवातस्थानिक नगरसेवक मनोहर डुंबरे यांचा पाठपुरावा


ठाणे, दि. १८ (प्रतिनिधी) : हिरानंदानी इस्टेट परिसरातील महापालिकेच्या घनकचरा विभागाने साठविलेल्या कचऱ्यामुळे झालेली दुर्गंधी दूर होणार आहे. भाजपचे नगरसेवक मनोहर डुंबरे यांच्या पाठपुराव्यानंतर भाजपचे आमदार निरंजन डावखरे यांच्या उपस्थितीत महापालिका आयुक्त सौरव राव यांनी आज बैठक घेतली. तसेच दिवाळीनंतर साचविलेला कचरा तातडीने हटविण्यास सुरूवात करण्याचे आदेश दिले. त्यानंतर आज रात्रीपर्यंत संपूर्ण कचरा हटविण्यास युद्धपातळीवर सुरुवात झाली.

महापालिकेच्या घनकचरा विभागाने शहरातील विविध भागात दररोज परिसरातील कचरा जमवून डंपरने एकत्र पाठविण्यासाठी डेपो सुरू केले आहेत. हिरानंदानी इस्टेटमधील रोडाज् संकुलाजवळ कचरा डेपोमध्ये परिसरातील कचरा जमा करून दररोज उचलला जातो. मात्र, दिवाळीच्या काळात फटाक्यांमुळे मोठ्या प्रमाणावर कचरा जमा झाला होता. कचऱ्याचे ढीग झाल्याने परिसराला डंपिंग ग्राऊंडचे स्वरुप आले होते. महापालिकेकडून कचरा वेळीच न उचलल्यामुळे या परिसरात दुर्गंधी पसरली होती. त्यामुळे नागरिक त्रस्त झाल होते.
या परिस्थितीविरोधात भाजपचे नगरसेवक मनोहर डुंबरे यांनी आवाज उठविला. त्यानंतर आमदार निरंजन डावखरे यांच्या उपस्थितीत महापालिका मुख्यालयात आयुक्त सौरव राव यांनी बैठक घेतली. या बैठकीला मनोहर डुंबरे यांच्यासह महापालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची उपस्थिती होती.
या बैठकीत हिरानंदानी इस्टेट परिसरातील जमा झालेला कचरा तातडीने हटविण्याचे आदेश देण्यात आले. त्यानंतर घनकचरा विभागाने ४० ते ५० डंपरच्या फेऱ्या मारून कचरा उचलण्यास सुरुवात केली. या भागातील कचरा रात्री उशिरापर्यंत वाहून नेला जाणार असल्याचे घनकचरा विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

Shahar Varta News
Shahar Varta News