ठाणे :
नव्या पिढीमध्ये वाचनाची आवड निर्माण व्हावी, पुस्तक संस्कृतीचा विस्तार व्हावा आणि मुंबई महानगर प्रदेशातील अधिकाधिक नागरिकांना साहित्यविश्वाशी जोडता यावे, या उद्देशाने कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार ॲड. निरंजन डावखरे यांनी पुढाकार घेतला आहे. त्यांच्या पुढाकारातून मुंबईसह ठाणे, पालघर आणि परिसरातील वाचकांसाठी भव्य ‘मुंबई पुस्तक महोत्सवा’चे आयोजन करण्यात येत आहे. राष्ट्रीय पुस्तक न्यास, भारत सरकार, महाराष्ट्र शासन, मुंबई विद्यापीठ आणि बृहन्मुंबई महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने २४ ते २९ नोव्हेंबर २०२६ या कालावधीत मुंबई विद्यापीठाच्या कालिना परिसरात हा महोत्सव रंगणार आहे.
या महोत्सवाची माहिती देण्यासाठी सतीश प्रधान ज्ञानसाधना महाविद्यालय येथे आयोजित पत्रकार परिषदेत आमदार ॲड. निरंजन डावखरे यांच्यासह राष्ट्रीय पुस्तक न्यासाचे अध्यक्ष प्रा. मिलिंद मराठे, मुंबई पुस्तक महोत्सवाचे संयोजक पवन त्रिपाठी आणि मुंबई विद्यापीठाचे उपकुलगुरू प्रा. डॉ. अजय भामरे यांनी महोत्सवाची संकल्पना, स्वरूप आणि विविध उपक्रमांची माहिती दिली.
*वाचनसंस्कृतीच्या संवर्धनासाठी व्यापक व्यासपीठ*
डिजिटल माध्यमांचा प्रभाव वाढत असला, तरी पुस्तकांचे महत्त्व आणि वाचनाची गरज कायम आहे. वाचनामुळे व्यक्तीच्या विचारांची समृद्धी होते, ज्ञानाचा विस्तार होतो आणि समाजाची वैचारिक जडणघडण घडते. त्यामुळे वाचनसंस्कृती केवळ टिकविणे नव्हे, तर ती नव्या पिढीपर्यंत अधिक प्रभावीपणे पोहोचविणे आवश्यक आहे. मुंबई पुस्तक महोत्सवाच्या माध्यमातून विविध भारतीय भाषांतील साहित्य, लेखक, प्रकाशक, विद्यार्थी आणि वाचक यांना एकाच व्यासपीठावर आणण्याचा प्रयत्न आहे, असे आमदार ॲड. निरंजन डावखरे यांनी यावेळी सांगितले.
मुंबई पुस्तक महोत्सव हे नाव असले, तरी त्याचा आवाका मुंबईपुरता मर्यादित राहणार नाही. ठाणे, पालघर, नवी मुंबई, भिवंडी, कल्याण-डोंबिवली, अंबरनाथ, बदलापूर, मीरा-भाईंदर आणि वसई-विरार या परिसरातील नागरिक, विद्यार्थी, शिक्षक आणि साहित्यप्रेमींनाही या महोत्सवात सहभागी होण्याची संधी मिळणार आहे. त्यामुळे मुंबई महानगर प्रदेशातील वाचक चळवळीला नवी दिशा आणि बळ मिळेल.
*४०० प्रकाशकांचे ६०० स्टॉल्स; साहित्यविश्वाचा अनोखा अनुभव*
या सहा दिवसीय महोत्सवात सुमारे ४०० प्रकाशकांचे ६०० स्टॉल्स उभारण्यात येणार आहेत. विविध भारतीय भाषांमधील साहित्य, कथा, कादंबऱ्या, चरित्रे, वैचारिक पुस्तके, बालसाहित्य आणि इतर विषयांवरील पुस्तकांचा मोठा संग्रह वाचकांसाठी उपलब्ध असेल. पुस्तक प्रदर्शनासोबतच पुस्तक प्रकाशन, साहित्यिक चर्चा, पुस्तक समीक्षण, कविता वाचन, कथा वाचन आणि लेखक-विचारवंतांशी संवाद असे विविध उपक्रम आयोजित करण्यात आले आहेत.
महोत्सवात सकाळी १० ते दुपारी १२.३० या वेळेत ‘चिल्ड्रन्स कॉर्नर’मध्ये मुलांसाठी गोष्ट सांगणे, लाऊड रीडिंग, सायलेंट रीडिंग, चित्रकला, कार्टून मेकिंग आणि मराठी कॅलिग्राफी यांसारखे उपक्रम होतील. मुलांमध्ये लहानपणापासूनच वाचनाची गोडी निर्माण व्हावी, हा या उपक्रमामागील प्रमुख उद्देश आहे.
दुपारी १ ते सायंकाळी ६ या वेळेत ‘लेखक मंच १’ आणि ‘लेखक मंच २’ या दोन सभागृहांमध्ये साहित्यिक आणि वैचारिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. शरणकुमार लिंबाळे, विश्वास पाटील, दीपक करंजीकर, अभिजीत जोग, अरुणा ढेरे, अभिराम भडकमकर आणि रमेश पतंगे यांच्यासह अनेक मान्यवर सहभागी होणार आहेत.
तसेच अक्षत गुप्ता, कुलप्रीत यादव, प्रसून जोशी, अनुपम खेर, आचार्य बालकृष्ण, आचार्य प्रशांत, दीपा मलिक, ग्रुप कॅप्टन शुभांशु शुक्ला, गुलजार, चंद्रप्रकाश द्विवेदी, मनोज मुंतशीर, दिल्लीचे नायब राज्यपाल सरदार चरणजीतसिंग संधू, गुजराती लेखक राम मोरी आणि कन्नड लेखक कृष्णमूर्ती हानुरू यांच्याशीही संवाद साधण्याची संधी रसिकांना मिळणार आहे.
*साहित्याबरोबरच सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी*
सायंकाळी ७ ते रात्री १० या वेळेत विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर होणार आहेत. वैशाली सामंत आणि अवधूत गुप्ते यांची संगीत मैफल, केरळचा ‘ताई कुडंब्रीज’ बँड, मुंबई विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांचा ‘सुवर्ण युवा’ कार्यक्रम, कैलाश खेर यांचे गायन, ‘मधुरम बोरुते ब्लॉग’ हा अभिजात मराठीच्या प्रवासावरील संगीत कार्यक्रम आणि विक्रम हाजरा यांचा भजन कार्यक्रम ही या महोत्सवाची विशेष आकर्षणे असतील.
वाचन सल्लागारांची भूमिका, वाचनाची सवय कशी रुजवावी, ग्रंथपालांची बदलती भूमिका आणि आजच्या काळातील वाचनसंस्कृती अशा विषयांवरही विचारमंथन होणार आहे. महात्मा ज्योतिराव फुले यांच्या जीवनावर आधारित प्रदर्शन, ‘वंदे मातरम्’च्या १५० वर्षपूर्तीनिमित्त विशेष प्रदर्शन आणि सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १५०व्या जयंतीनिमित्त माहितीपूर्ण प्रदर्शनही आयोजित करण्यात येणार आहे.
*मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन*
२४ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ४ वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते महोत्सवाचे उद्घाटन होणार आहे. २६ नोव्हेंबर रोजी दुपारी २ वाजता विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला अभिजात भाषा मंत्री उदय सामंत, सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार, राष्ट्रीय पुस्तक न्यासाचे ट्रस्टी राजेश पांडे, मराठी साहित्य परिषदेचे अध्यक्ष योगेश सोमण आणि प्रदीप निफाडकर उपस्थित राहणार आहेत. त्याच दिवशी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील हेही महोत्सवाला भेट देणार आहेत.
मुंबई आणि कोकण परिसरात ५० वर्षांहून अधिक काळ पुस्तकनिर्मिती आणि साहित्य-संस्कृतीच्या प्रसारासाठी योगदान देणाऱ्या प्रकाशकांचा, तसेच ५० वर्षांहून अधिक काळ कार्यरत असलेल्या सार्वजनिक वाचनालयांचा विशेष सन्मान करण्यात येणार आहे.
*महोत्सवाची वेळ व प्रवेश*
मुंबई विद्यापीठाच्या कालिना परिसरात होणारा हा महोत्सव नागरिकांसाठी पूर्णपणे विनामूल्य खुला असेल. सकाळी ११ ते रात्री १० या वेळेत नागरिकांना महोत्सवाला भेट देता येईल.
पुस्तक हे केवळ ज्ञान मिळविण्याचे साधन नसून विचारांना दिशा देणारे आणि समाजाला प्रगल्भ बनविणारे माध्यम आहे. त्यामुळे मुंबई पुस्तक महोत्सवाच्या माध्यमातून वाचक, लेखक, विद्यार्थी आणि साहित्यप्रेमींना एकत्र आणण्याबरोबरच नव्या पिढीमध्ये वाचनाची आवड निर्माण करण्याचा प्रयत्न आहे. ठाणे, पालघर आणि मुंबई महानगर प्रदेशातील नागरिकांनी कुटुंबासह या महोत्सवाला भेट देऊन या साहित्यिक पर्वाचा आनंद घ्यावा, असे आवाहन आमदार ॲड. निरंजन डावखरे यांनी केले आहे.
वाचेल भारत, विकसित होईल भारत!
सगळे वाचूया, एकत्र वाचूया!